सोनाली, प्रथमेशला तिहेरी मुकुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:57 AM2018-06-11T00:57:48+5:302018-06-11T00:58:33+5:30
विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी झालेल्या के. डी. गादिया स्मृती औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत सेनाली मिर्खेलकर आणि प्रथमेश कुलकर्णी यांनी तिहेरी मुकुट पटकावला. या दोघांनी अनुक्रमे मुली आणि मुलांच्या १५, १७ व १९ वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकावले.
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी झालेल्या के. डी. गादिया स्मृती औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत सेनाली मिर्खेलकर आणि प्रथमेश कुलकर्णी यांनी तिहेरी मुकुट पटकावला. या दोघांनी अनुक्रमे मुली आणि मुलांच्या १५, १७ व १९ वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकावले.
मुलींच्या १५ वर्षांखालील गटात सोनाली मिर्खेलकरने मिताली कुलकर्णी हिच्यावर अंतिम सामन्यात २१-१०, २१-८ अशी मात केली. त्याचप्रमाणे सोनालीने १७ वर्षांखालील अंतिम सामन्यात पूर्वी सेठ हिच्यावर २१-१२, २१-१२ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले. सोनालीने १९ वर्षांखालील गटात मिताली कुलकर्णीचा २१-१४, २१-८ असा पराभव करीत तिहेरी मुकुटावर शिक्कामोर्तब केला. महिला गटात नेहा सिकची हिने कोमल चित्तोडकर हिच्यावर १७-२१, २१-१३, २१-१७ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले.
मुलांच्या १५ वर्षांखालील गटात प्रथमेश कुलकर्णी याने अंतिम सामन्यात प्रांषू गुमटेचा २१-१६, २१-९ असा पराभव केला. त्यानंतर प्रथमेशने १७ वर्षांखालील गटात मानस पाटीलचे आव्हान २१-१८, २१-१८ व १९ वर्षांखालील गटात कुणाल चामरगोरेचा २१-१५, २१-१७ असा पराभव करीत तिहेरी मुकुटांवर शिक्कामोर्तब केला. पुरुष एकेरीत अर्णव तांबे याने साकेत औटी याच्यावर २१-१६, २१-१७ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले.
मुलांच्या १० वर्षांखालील वयोगटाच्या अंतिम सामन्यात सार्थक नलावडेने उदयन देशमुखचा २१-१९, २१-१६ आणि मुलींच्या गटात वेदिका जवळकरने नैनिका रिनगावकरचा १७-२१, २१-१५, २१-१२ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. मुलांच्या १३ वर्षांखालील गटात देवांश बडवे याने आदित्य बेंबडे याच्यावर ६-२१, २१-१९, २१-८ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले. मुलींच्या गटात सिया बेंबडे हिने संस्कृती सातारकर हिच्यावर २०-२२, २१-१५, २१-१८ अशी मात करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
१५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत आझम खान व सुधांशू शिंदे या जोडीने प्रांषू गुमटे व भार्गवराम पेडगावकरचा २१-१४, १७-२१, २१-१५ असा पराभव केला. १७ वर्षांखालील दुहेरीत आदित्य नेमिवंत व मानस पाटील जोडीने सिद्धार्थ मुथियान व सदानंद महाजन यांचा २३-२१, २१-१९, २१-१० व पुरुष दुहेरीत तेजस चौधरी व साकेत औटी यांनी हिमांशू गोडबोले व अर्णव तांबे यांना २१-१९, २१-१६ असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले.
बक्षीस वितरण पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, राहुल देशमुख, शुभांगी जोशी, परीक्षित पाटील, नरेश गुंडले, सत्यबोध टंकसाली, हर्षा देशपांडे, भक्ती मोदाळे, वीरेंद्र पाटील, नितीन इंगोले, मिलिंद देशमुख, प्रभू रापतवार, ऋतुपर्ण कुलकर्णी, जावेद पठाण, हिमांशू गोडबोले आदी उपस्थित होते.