‘सोनियाची उगवली सकाळ...’; १४ एप्रिल रोजी जन्मलेल्या ४५ शिशूंना बेबी कीट, संविधान वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 01:19 PM2023-04-15T13:19:51+5:302023-04-15T13:21:05+5:30
घाटी रुग्णालयात जन्मलेल्या शिशू आणि त्यांच्या आई-वडिलांना भारतीय संविधान ग्रंथ, बेबी किट, दुपट्टे यांचे वाटप करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात शुक्रवारी अनोख्या उपक्रमातून भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. ‘सोनियाची उगवली सकाळ, जन्मास आले भीम बाळ’ या ओळींप्रमाणे १४ एप्रिल या सुवर्ण दिनी जन्मास आलेल्या नवजात शिशूंना बेबी किट, दुपट्टे अन् भारतीय संविधान ग्रंथ वाटप करण्यात आले.
चक्रवर्ती सम्राट अशोक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी रिपब्लिकन सेनेतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष (मध्य) रमेश बनसोडे यांच्या हस्ते झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी कास्ट्राइब संघटनेचे विलास जगताप, शेखर मगर, भिक्खुणी धम्मदेशना, भिक्खू नागसेन भन्ते, सुनीलअण्णा मनोरे, आनंद दाभाडे , चंद्रकांत रूपेकर, काकासाहेब गायकवाड, सिद्धोधन मोरे, सचिन निकम, मनीषा साळुंखे, राहुल कानडे,अजय बनसोडे, बबन साठे, सुनील पांडे, रामराव नरवडे, विकास हिवराळे, विनोद वाकोडे, सचिन शिंगाडे, शेषराव दाणे आदी उपस्थित होते.
फळवाटपही
घाटी रुग्णालयात जन्मलेल्या शिशू आणि त्यांच्या आई-वडिलांना भारतीय संविधान ग्रंथ, बेबी किट, दुपट्टे यांचे वाटप करण्यात आले. यावेळी फळवाटपही करण्यात आले. शिक्षणमहर्षी माधव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय संविधान ग्रंथाचे वाटप करण्यात आले. काकासाहेब गायकवाड, बबन साठे, सुनील पांडे यांच्या वतीने बेबी किट व बाळाला गुंडाळण्यासाठी दुपटे वाटप करण्यात आले.