पोलिस, निवृत्त जवानाच्या मुलांनी बनवली चोरांची टोळी; चोरीच्या सोन्यावर घेत गोल्ड लोन
By सुमित डोळे | Published: November 21, 2023 05:17 PM2023-11-21T17:17:26+5:302023-11-21T17:23:05+5:30
सिनेस्टाईल चोर सिडको पोलिसांकडून अटकेत, फायनान्स कंपनीत चोरीचे सोने ठेवून घ्यायचे कर्ज
छत्रपती संभाजीनगर : एके काळी ज्याने मोबाईल चोरला, त्याच्याशीच पुण्याच्या नामांकित महाविद्यालयातून एमबीए उत्तीर्ण तरुणाची मैत्री झाली. व्यसनातून त्यांच्यातली मैत्री ‘बहरत’ गेली व दोघांनी चोरांची टोळी तयार करून सोनसाखळी, मोबाईल चोरी सुरू केली. सिडको पोलिसांनी सलग ४८ तास तपास करून त्यांना अटक केली. प्रशांत उर्फ रॉ जालिंदर आहेर (१९, रा. श्रीकृष्णनगर) व आशिष उर्फ जॉर्डन गायकवाड (रा. एन-१२) अशी आरोपींची नावे असून तिसरा चोर अल्पवयीन आहे.
शनिवारी सकाळी एन-५ मध्ये सुमन कुडमेहता या घरासमोर रांगोळी काढत असताना मोपेडस्वार चोरांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. सिडकोच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या सूचनेवरुन सहायक निरीक्षक श्रध्दा वायदंडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पंकज मोरे यांनी वेगाने तपास सुरू केला. घटनास्थळापासून चोर फरशी मैदानाच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. गुप्त बातमीदाराने त्यातील अल्पवयीन मुलाला ओळखले. तो व रॉ यांची टोळी नेहमी फरशी मैदानात नशा करत बसत असल्याचे सांगितले. त्यावरून अंमलदार सुभाष शेवाळे, विजयानंद गवळी, लालखाँ पठाण, प्रदीप दंडवते, विशाल सोनवणे, संदीप जाधव, सहदेव साबळे, अनिल सोमवंशी यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत रॉ ने आशिषसोबत मिळून मागील १५ दिवसांमध्ये चिश्तिया चौकातून दुचाकी, एन-८, एन-५ मध्ये सोनसाखळी व शहरातून ६ मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली.
मोबाईल चोरला अन् मैत्री झाली
रॉ चे वडील जिल्हा पोलिस दलात हेडकॉन्स्टेबल आहेत तर आशिषचे वडिल निवृत्त लष्कर जवान आहेत. आशिष पुण्याच्या नामांकित महाविद्यालयातून एमबीए उत्तीर्ण आहे. रॉ वर यापूर्वी हत्येचा प्रयत्न, चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्ये रॉ ने आशिषचा मोबाईल चोरला होता. रॉ ने मोबाईल चोरून आशिषला कॉल करून माेबाईल सापडल्याचे सांगून १ हजार रुपयांची मागणी करून परत दिला. त्याच दरम्यान आशिषची राॅ सोबत मैत्री फुलली. पुढे तो रॉच्या टोळीशीही जाेडला गेला.
चोरीच्या सोन्यावर गोल्ड लोन
शहरात मोपेडवर फिरून रॉचे अन्य मित्र मोबाईल चोरतात. ते घेऊन विकण्याची जबाबदारी अल्पवयीन चोर पार पाडतो. रात्रभर नशा करून पहाटेपर्यंत चोरीसाठी सावज शोधत फिरतात. आशिष अस्खलीत इंग्रजी बोलतो. त्याला बँक, फायनान्सचे सर्व ज्ञान आहे. चाेरीचे सोने फायनान्स कंपनीत ठेवून कर्ज घेण्याची शक्कल त्यानेच त्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी सर्व सोने बड्या गोल्ड लोन फायनान्स कंपनीत ठेवायला लागले.