डीएमआयसीतील निवासी भूखंडांचे लवकरच वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:03 AM2018-01-08T00:03:58+5:302018-01-08T00:04:31+5:30
दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये उद्योग इच्छुकांसाठी भूखंडांच्या वाटपाला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जानेवारीअखेर कामगार वसाहतीच्या अनुषंगाने तसेच उच्च, मध्यम व अल्प उत्पन्न गटातील रहिवासी भूखंड वाटप करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये उद्योग इच्छुकांसाठी भूखंडांच्या वाटपाला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जानेवारीअखेर कामगार वसाहतीच्या अनुषंगाने तसेच उच्च, मध्यम व अल्प उत्पन्न गटातील रहिवासी भूखंड वाटप करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
१५ ते २० एकरामध्ये पहिल्या टप्प्यात नियोजन असणार आहे. ३ लाख रोजगार निर्मिती क्षमतेची //ती वसाहती २०१९ च्या जून मध्ये पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने सज्ज असणार आहे.// तत्पूर्वी, कुशल मनुष्यबळाची वानवा त्या औद्योगिक वसाहतीला जाणवणार नाही, याचा विचार सुरू झाला आहे. डीएमआयसीमधील पायाभूत सुविधांचे काम वेगाने सुरू आहे. उड्डाणपूल, प्रशासकीय इमारतीच्या कामासह अंतर्गत रस्त्यांचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करून १४ महिने झाले आहेत. मध्यंतरी काम मंदावले होते, आता कामाने मोठा वेग घेतला आहे.
दरम्यानच्या काळात बिडकीन इंडस्ट्रिअलपार्कच्या पायाभूत सुविधांसाठी एल. अॅण्ड टी. या कंपनीला कंत्राट देण्यात आले. ते कामदेखील सुरू झाले आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्रात ग्लोबल इंडस्ट्रिअल सेमिनार होणार असून, त्यामध्ये डीएमआयसीचा सुसज्ज स्टॉल लावण्यात येणार आहे.