शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून १२५ कोटींची घोषणा होताच सत्ताधाऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 03:38 PM2019-01-05T15:38:57+5:302019-01-05T15:41:19+5:30
दोन दिवसांत १२५ कोटी रुपयांतून कोणते रस्ते करण्यात येतील, त्याचा प्रस्ताव मनपाकडून मंत्रालयात सादर केला जाणार आहे.
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जानेवारी रोजी १२५ कोटी रुपयांची घोषणा केली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला १२५ कोटींचे स्वप्न पडू लागले आहे. शुक्रवारी ताबडतोब रस्त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू करावे, अशा सूचना प्रशासनाला सत्ताधाऱ्यांनी दिल्या. दोन दिवसांत १२५ कोटी रुपयांतून कोणते रस्ते करण्यात येतील, त्याचा प्रस्ताव मंत्रालयात सादर केला जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे व इतर प्रस्तावही दिले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्त्यांसाठी आणखी १२५ कोटी रुपये विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्याची घोषणा केल्याने सत्ताधाऱ्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. दोन महिन्याच्या आत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणयाची चिन्हे आहेत. त्यामुळे तातडीने रस्त्यांची यादी करून शासनमंजुरी घेण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे.
६८ कोटी रुपयांच्या डिफर्ड पेमेंटच्या रस्ते कामांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविल्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दीड वर्षापूर्वी १०० कोटींचा निधी शासनाने रस्त्यांसाठी मंजूर केला, त्या कामांचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी करण्यात आले. १०० कोटींच्या रस्त्यांसह पालिकेने स्वत:च्या निधीतून डिफर्ड पेमेंटवर ५० कोटींचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कंत्राटदारांनी निविदेकडे पाठ फिरविली आहे. डिफर्ड पेमेंटच्या या २१ रस्त्यांचे सुधारित अंदाजपत्रक ६८ कोटी झाले आहे. या कामांसाठी निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. आता फेरनिविदा मागविण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. शंभर कोटींच्या कामांत ३० रस्त्यांचाच समावेश झाला. त्यामुळे उर्वरित नगरसेवकांना डिफर्ड पेमेंटमधून त्यांच्या वॉर्डातील रस्ते करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले; परंतु निविदांना कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्यामुळे नगरसेवकांत नाराजी आहे. डिफर्ड पेमेंटचे रस्ते रद्द करावेत, १२५ कोटींच्या प्रस्तावात आमचे रस्ते घ्यावेत, अशी मागणीही नगरसेवक करीत आहेत.
महापौर म्हणाले; सर्व प्रस्ताव एकत्रितपणे पाठवणार
रस्त्यांना १२५ कोटी देण्यासह मुख्यमंत्र्यांनी क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे व संशोधन केंद्रासाठी सात कोटी रुपये १५ दिवसांत देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या प्रस्तावासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व इतर प्रस्ताव दिले जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.