चौकशी लागताच जादू झाली, गायब झालेली मका गोदामात आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:06 AM2021-02-13T04:06:06+5:302021-02-13T04:06:06+5:30
वैजापूर : मुदत संपल्याने खरेदी- विक्री संघाने खरेदी केलेली ३४३.५० क्विंटल मका गोदामातून गहाळ झाली होती. या मक्याचे शेतकऱ्यांना ...
वैजापूर : मुदत संपल्याने खरेदी- विक्री संघाने खरेदी केलेली ३४३.५० क्विंटल मका गोदामातून गहाळ झाली होती. या मक्याचे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याने ते यासाठी पाठपुरावा करीत होते. सदर मका परत देण्याचे आदेश देऊनही सात महिन्यांपासून मका किंवा पैसे मिळण्याची दहा शेतकरी वाट पाहत होते. ही मका गोदामातून गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच खळबळ उडाली. यानंतर सदर शेतकरीही उपोषणास बसले चौकशीचा ससेमिरा लागताच गायब झालेली मका जादुई पद्धतीने पुन्हा गोदामात हजर झाली आहे.
खरेदी- विक्री संघाच्या वतीने २०१९-२० मध्ये मका खरेदी करण्यात आली. शासनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी बंद केली. खरेदी बंद झाल्यानंतर खरेदी- विक्री संघाने दहा शेतकऱ्यांची ३४३.५० मका खरेदी करून घायगाव येथील भाग्योदय जिनिंगच्या गोदामात ठेवली होती. त्यानंतर ही पूर्ण मका तहसील प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली. वैजापूर तलाठी सज्जाचे तलाठी जितेंद्र चापानेरकर यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन गोदामाच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या. सदर शेतकऱ्यांना मक्याचे पैसे न मिळाल्याने त्यांनी पाठपुरावा केला. नोंदणी नसल्याने पैसे देणे शक्य नसल्याने मका परत करण्याचे आदेश जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दिले होते. आदेश देऊनही सात महिन्यांपासून या शेतकऱ्यांना मका मिळाली नव्हती. यानंतर गोदामातून ही मका गायब झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने पुढे आणले. यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. यानंतर सदर शेतकरीही उपोषणास बसले होते. यानंतर तहसीलदारांनी तलाठी जितेंद्र चापानेरकर यांना नोटीस बजावून पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार मनोहर वाणी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही चौकशी सुरू झाल्यानंतर अचानक गोदामात ३४६ क्विंटल मका आढळून आली आहे. मका तिथेच होती असा अहवाल वाणी यांनी तहसीलदारांना दिला आहे. मात्र, यात नियोजनबद्ध षडयंत्र असून हे प्रकरण संपविण्यासाठी प्रशासनाकडून ही सारवासारव केली जात आहे.
चौकट
इतके दिवस मका होती कुठे?
मका गायब होण्यामागे मोठे षडयंत्र असल्याचे या एकंदरीत प्रकरणावरून दिसत आहे. इतके दिवस शेतकऱ्यांना परत करण्यासाठी मका नव्हती. चौकशीचा ससेमिरा मागे लागून हे प्रकरण अंगलट येणार असल्याचे स्पष्ट होताच अचानक ही मका गोदामात अवतरली आहे. यात भीतीमुळे दुसरीकडून खरेदी करून येथे मका आणून ठेवल्याची कुजबुज आता तालुक्यातील नागरिक करीत आहेत. प्रशासनाच्या या जादूच्या कांडीचीही सर्वत्र चर्चा होत आहे.