मालोजीराजे भोसले गढीचे चित्र पालटणार; ५ कोटींचा आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 06:07 PM2021-02-16T18:07:11+5:302021-02-16T18:09:56+5:30
Maloji Raje Bhosle Gadhi, Verul वेरुळ येथील शहाजी राजे भोसले स्मारकावर सास्कृतिक मंञी अमित देशमुख यांनी आज भेट देवून स्मारक परिसराची पाहणी केली.
खुलताबाद : वेरुळ येथील मालोजीराजे भोसले यांच्या मालकीच्या गढीचे संवर्धन व जतन करण्यासाठी शासनाने हाती घेतले आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा नव्याने आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जगप्रसिध्द वेरुळ लेण्यांमध्ये इलेक्ट्रिक बसेसची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक व वैद्यकिय शिक्षण मंञी अमित देशमुख यांनी मंगळवारी (दिं.16) वेरुळ येथे पञकार परिषदेत दिली.
तालुक्यातील वेरुळ येथील शहाजी राजे भोसले स्मारकावर सास्कृतिक मंञी अमित देशमुख यांनी आज भेट देवून स्मारक परिसराची पाहणी केली. अभ्यासक व पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांकडून गढीची सविस्तर माहिती जाणुन घेतली. त्यानंतर मंत्री देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील गड, किल्ले, प्राचीन स्थळे यांच्या विकासाबाबत महाविकास आघाडी सरकार संवेदनशील असून मालोजीराजे भोसले गढी ही ऐतिहासिक वारसा आहे. याचे जतन करण्याबरोबरच संवर्धन व विकास करण्यात येईल. यासाठी ५ कोटींचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच शहाजीराजे भोसले यांच्या नावाने संशोधन केंद्र सुरु करण्याचे विचाराधीन असल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे , माजी आमदार डॉ.कल्याण काळे, जि.प.अध्यक्षा मीनाताई शेळके, जि.म.सह.बॅंकेचे संचालक किरण पाटील डोंणगांवकर, विलास औताडे, तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे , माजी सभापती महेश उबाळे , मजहर पटेल, किशोर चव्हाण , मनोज पाटील, जगन्नाथ खोसरे, सरपंच कुसूम प्रकाश मिसाळ , उपसरपंच विजय राठोड, गणपत म्हस्के, आबेद जहागीरदार, संजय मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचीन मंदिरांचा होणार जीर्णोधार आणि पुर्नविकास
शासनाने महाराष्ट्रातील प्राचीन मंदीरांचा जीर्णोधार आणि पुर्नविकास करण्याचे ठरविले आहे. त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद येथील सातारा परिसरीतील खंडोबा मंदीर, तुळजापूर, कंकाळेश्वर, औंढा नागनाथ , माहुर येथील रेणूका मंदीर, नरसिंग मंदीर व इतर मंदीराचा पहिल्या टप्प्यात समावेश असल्याची माहिती मंत्री देशमुख यांनी दिली. यासोबतच वेरूळ लेण्यांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महोत्सव, जिल्हा सांस्कृतिक केंद्र उभारणे, शहाजीराजे भोसले यांच्या नावाने संशोधन केंद्र, दौलताबाद किल्ला परिसरात आधुनिक सोयी सुविधा देणे, वेरूळ येथील लेणी परिसरातील पर्यटक अभ्यागत केंद्राची सेवा पुरवत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.