दंडात्मक कारवाई सुरू होताच व्यापाऱ्यांनी केला तासभर मोंढा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:02 AM2021-03-13T04:02:57+5:302021-03-13T04:02:57+5:30
औरंगाबाद : अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जिल्हा प्रशासनाचे पथक दुपारी जुन्या मोंढ्यात अचानक दाखल झाले. कोविड तपासणी न केलेल्या ...
औरंगाबाद : अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जिल्हा प्रशासनाचे पथक दुपारी जुन्या मोंढ्यात अचानक दाखल झाले. कोविड तपासणी न केलेल्या व्यापाऱ्यांविरुद्ध २ हजार रुपये दंडात्मक कारवाई सुरू करताच संतापलेल्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.
निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर व तहसीलदार ज्योती पवार तसेच मनपाचा अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी दुपारी २ ते अडीच वाजेदरम्यान अचानक जुन्या मोंढ्यात दाखल झाले व कोविड चाचणी न केलेल्या दुकानदारांना २ हजार रुपये दंडाच्या पावत्या देणे सुरू केले. अचानक झालेल्या कारवाईने संतापलेल्या व्यापाऱ्यांनी लगेच दुकानांचे शटर बंद करणे सुरू केले. बघता बघता १५ मिनिटांत मोंढ्यातील सर्व दुकाने बंद झाली. वातावरण तापत असल्याचे पाहून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना
आरटीपीसीआर, अँटिजन टेस्ट करून घेण्याचे सांगितले. व्यापाऱ्यांनी कोविड चाचणी करून घेण्याचे आश्वासन दिल्याने कारवाई थांबविण्यात आली. त्यानंतर तासाभराने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली.
चौकट
६०० जण चाचणीसाठी तयार
जुन्या मोंढ्यात १२० दुकाने आहेत. व्यापारी, कर्मचारी व हमाल मिळून ६०० जण येथे कार्यरत आहे. सर्वजण आरटीपीसीआर किंवा अँटिजन टेस्ट करण्यास तयार आहोत. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, पण मनपाची तयारी आहे का? एका दिवसात चाचणी होणार नाही. प्रशासनाने वेळ द्यावा. अचानक कारवाई करू नये.
संजय कांकरिया,
व्यापारी प्रतिनिधी