हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेला धडा शिकवणार; भाजपचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 07:35 PM2020-08-08T19:35:35+5:302020-08-08T19:39:56+5:30
राममंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी जल्लोष केल्यामुळे दाखल केलेल्या गुन्ह्यांचा पदाधिकाऱ्यांनी केला निषेध
औरंगाबाद : अयोध्या येथे ऐतिहासिक राममंदिराचे भूमिपूजन होत असताना देशातील प्रत्येक हिंदूच्या घरात दिवाळी साजरी करण्यात येत होती. मात्र, हिंदुत्व सोडलेल्या शिवसेना सरकारने औरंगाबादेत ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करणाऱ्या भाजपच्या कार्येकर्ते, पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. याचा निषेध करीत हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेला आगामी काळात धडा शिकविणार असल्याचा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
राममंदिर उभारणीच्या पायाभरणीचा जल्लोष भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरभर केला. त्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असून, पोलीस त्यांना अटक करीत आहेत. या अटकेचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला शहराध्यक्ष संजय केणेकर, आ. अतुल सावे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, डॉ. राम बुधवंत उपस्थित होते.
केणेकर म्हणाले, ज्याठिकाणी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा आणि शिवसेनाचा जन्म झाला त्या गुलमंडीवर राम जन्मभूमीचा आनंद साजरा करणाऱ्या १५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिवसेना हिंदुत्व विसरली आहे. आगामी काळात शिवसेनेला धडा शिकवला जाईल. हिंदुत्व काय असते हेसुद्धा दाखवून दिले जाईल. राममंदिरासाठी भाजपचे पदाधिकारी अटक होण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.
यापेक्षा दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही
आ. सावे म्हणाले, राज्यामध्ये सध्या निजामशाहीचे राज्य असल्याचे दिसून येत आहे. लोकांच्या आस्थेचा विषय मार्गी लागला, त्याचा आनंद साजरा केला जात असताना गुन्हे दाखल होत असतील, तर त्यापेक्षा दुर्दैवाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही. काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना हिंदूंवर गुन्हे दाखल होत आहेत, ही शोकांतिका आहे.