रुग्णांना रेफर करण्याची ठरली ‘एसओपी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:02 AM2021-03-21T04:02:22+5:302021-03-21T04:02:22+5:30
औरंगाबाद : शहरातील मनपा कोविड केअर सेंटर (सीसीसी), खासगी रुग्णालयांतून कोरोना रुग्णांना थेट घाटीत रेफर करण्याचे प्रमाण वाढले होते. ...
औरंगाबाद : शहरातील मनपा कोविड केअर सेंटर (सीसीसी), खासगी रुग्णालयांतून कोरोना रुग्णांना थेट घाटीत रेफर करण्याचे प्रमाण वाढले होते. यातून लक्षणे नसलेले, कोणताही त्रास नसलेले रुग्णांचे प्रमाण वाढले. परिणामी, गंभीर रुग्णांना खाटा मिळणे अवघड होत होते. ही परिस्थिती ओळखून रुग्णांना संदर्भीत करण्यासंदर्भात स्टँडर्ड आपरेटिंग प्राेटाेकाॅल (एसओपी) तयार करण्यात आला आहे. यातून घाटीवर अनावश्यक भार कमी होऊन, गंभीर रुग्णांना खाटा मिळणे सोपे होईल.
कोरोना रुग्णांची लक्षणे, लक्षणांची तीव्रता आणि लक्षणे नसणे, याद्वारे रुग्ण सीसीसी सेंटरमधून डीसीएचसी रुग्णालयात, डीसीएच रुग्णालयात हस्तांतरित करण्यासंदर्भात घाटीतील मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी अतिविशेषोपचार रुग्णालयाचे ओएसडी डाॅ. सुधीर चौधरी,वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. अविनाश लांब यांची उपस्थिती होती. यावेळी रुग्ण हस्तांतरित करण्यासंदर्भात चर्चा करून स्टँडर्ड आपरेटिंग प्राेटाेकाॅल (एसओपी) तयार करण्यात आला आहे.
रुम एअरचे रुग्ण सीसीसीत पाठविणार
घाटीत रुम एअरवर असलेले रुग्ण यशवंत सीसीसीला पाठविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात समिती तयार करण्यात आली आहे. एसओपीप्रमाणे रुग्णांना रेफर केले जाईल, असे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे यांनी सांगितले.
असे होणार रुग्ण हस्तांतर कार्यवाही
१)कोविड रुग्ण हस्तांतरित करण्यापूर्वी सीसीसी सेंटर अथवा डीसीएचसी रुग्णालयातील फिजिशियन हे घाटीतील (डीसीएच) डाॅ. अनिल जोशी, डाॅ. कैलास चितळे यांच्याशी रुग्णांसंदर्भात, खाटा उपलब्धतेसंदर्भात चर्चा करतील.
२)सीसीसी सेंटरकडून डीसीएच रुग्णालयातील आरएमओ यांना सूचित केले जाईल. त्यानंतर डीसीएच रुग्णालयातील आरएमओ हे रुग्णाला स्वीकारण्यासाठी ट्रेचर (ट्राली) आणि एका कर्मचाऱ्यासह हजर राहतील.
३)डीसीएचसी रुग्णालयांतून दिवसांतून केवळ दुपारी १२ ते २ या वेळेतच रुग्णाला संदर्भीत केले जाईल.