दुष्काळग्रस्तांच्या व्यथा : एकेकाळी नदीच्या पाण्यावर घेतला ऊस, आता टँकरवर भागवावी लागतेय तहान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:10 AM2019-05-08T06:10:38+5:302019-05-08T06:11:05+5:30
माझ्या डोळ्यासमोरचा काळ आहे. गिरिजा नदीच्या पात्रात पिंप टाकून १२ एकरांत ऊस काढायचो, इतकं पाणी होतं. त्याच ठिकाणी १२ पुरूस खोदलेली विहीर आता कोरडीठाक पडलीय.
- भागवत हिरेकर
औरंगाबाद : माझ्या डोळ्यासमोरचा काळ आहे. गिरिजा नदीच्या पात्रात पिंप टाकून १२ एकरांत ऊस काढायचो, इतकं पाणी होतं. त्याच ठिकाणी १२ पुरूस खोदलेली विहीर आता कोरडीठाक पडलीय. आता टँकर घेऊन तहान भागवावी लागतेय. छगन वनारसे नदीच्या पात्राकडे बोट दाखवून सांगत होते. नदी काठावरील हसनाबाद, घोषेगावमधील शेतकरी दुष्काळामुळे होरपळले आहेत.
भोकरदन तालुक्यातून जाणाऱ्या गिरिजा आणि पूर्णा नद्या अवैध वाळू उपशामुळेच वाहणं बंद झाल्या आहेत. या जोपर्यंत खळाळत्या होत्या, तोपर्यंत त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये कृषी संस्कृतीची बीज रोवली. त्याच नद्यांची पाण्यासाठी चाळणी झालीय. काठावरची शेती ओसाड पडली आहे.
वनारसे यांची सात एकर जमीन आहे. रिकामं बसवत नाही. काहीतरी करावं लागन ना? राजूरला रस्त्याची कामे करणाºया कंपनीत कामाला जातोय. चारशे रुपये हाजरी आणि एकवेळच जेवण. काय सांगायचं. पाण्यानं खेळ बिघडलाय सगळा. एव्हढं अवघड झालय की, घरादारासह जनावरांनाही टॅँकरने पाणी पाजावं लागतंय. बाराशे ते दीड हजार रुपये टँकरमागे जातात. एका जनावराला दिवसाला पन्नास लिटर पाणी लागतं. कडबा न्याराच, वनारसे म्हणाले.
गिरिजा नदीच्या खोºयातील हसनाबाद, घोषेगाव, इटा, खडगाव आणि पसिरातील पूर्णेच्या खोºयातील शेतकरी दुष्काळाच्या फेºयाने आता हैराण झाला आहे. काठावरची शेती ओसाड पडली आहे. हसनाबादमार्गे जाणाºया रस्त्याने फुलंब्रीपासून भोकरदनपर्यंत सगळ्यांचा एकच प्रश्न. पाणीच नाही, काय करायचं?
२५ टक्के मराठवाडा टँकरच्या पाण्यावर
औरंगाबाद : मराठवाड्यातील
सुमारे २५ टक्के ग्रामीण लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. २०११च्या जनगणनेनुसार विभागाची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख असून, यंदाच्या भीषण दुष्काळामुळे त्यातील सुमारे ४५ लाख लोक पाण्याविना व्याकूळ आहे. यंदाच्या वर्षातील दुष्काळ हा या दशकातील सर्वांत भीषण ठरत आहे.
२०१२नंतर प्रथमच पाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. २ हजार ७०० टँकरने सुमारे २ हजार गावांत आणि ७२५ वाड्यांवर पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. दर आठवड्याला ४२ गावांत टँकरची मागणी पूर्ण करावी लागते. ५१ टँकर त्यासाठी नव्याने सुरू करावे लागत आहेत. मे अखेरपर्यंत हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांतील दुष्काळ परिस्थिती अत्यंत भीषण आहे. उर्वरित जिल्ह्यांतही दुष्काळाच्या झळा बसत आहेत; परंतु त्या जिल्ह्यात थोड्या-फार प्रमाणात पाणी असल्यामुळे टँकरचा आकडा कमी आहे. ४४५९ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.
चारा, पाण्याअभावी
चार गायी दगावल्या
जळगाव : भोरस बुद्रुक येथील शेतकरी भैय्यासाहेब परभत पाटील यांच्या मालकीच्या दोन गायी व दोन वासरे चारा, पाण्याअभावी मरण पावल्या. त्यामुळे शेतकºयासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या आठवड्यात देवळी येथील पोपट नगा काठेवाडी यांच्या ४ गायी पाण्याअभावी दगावल्या.
दुष्काळासाठी केंद्र सरकारकडून राज्याला आणखी २१६० कोटी
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी २१६० कोटी रुपयांची मदत मिळाली असून त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून राज्याला सातत्याने मदत होते आहे. आतापर्यंत ४२४८.५९ कोटी रुपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर, चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता ४००० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत यापूर्वीच शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विहिरीने तळ गाठल्याने
शेतकºयाची आत्महत्या
कुरुल (जि. सोलापूर) : विहिरीने तळ गाठल्याने पाण्याअभावी ऊस जळून गेला तर डाळिंब बाग पाण्याअभावी जळून चालली होती. त्यामुळे
बँकेचे १२ लाख रुपये कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकºयाने आत्महत्या केली.
मोहोळ तालुक्यातील येणकी येथील तुकाराम निवृत्ती माने (५६) यांची बारा एकर शेती होती. पत्नी व दोन विवाहित मुलांसह ते शेतातील वस्तीवरच राहत होते.
दोन- तीन वर्षात पाऊस कमी झाल्याने विहिरीला जेमतेम पाणी असायचे. मात्र यंदा दुष्काळाने विहीर कोरडी पडल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. अक्षयतृतीया असल्याने कुटुंबातील सदस्य कामात व्यस्त होते. त्याच गडबडीत माने यांनी जीवन संपविले.