अॅक्सीलेटरच्या आवाजाने वाचला जीव, बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:40 PM2021-12-17T13:40:41+5:302021-12-17T13:42:21+5:30
पांचाळ पडताना ॲक्सीलेटर अचानक वाढले व दुचाकी रेस होऊन आवाज झाला. त्यामुळे बिबट्या घाबरून पाटोद्याच्या दिशेने वळला.
वाळूज महानगर : पांदीरस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारावर उसाच्या फडातून आलेल्या बिबट्याने झेप घेतली. मात्र वेगातील दुचाकी व स्वार खाली पडतांना घाईगडबडीत दुचाकीचे ॲक्सीलेटर वाढून मोठा आवाजा झाल्याने बिबट्याने धूम ठोकल्याची थरारक घटना गुरुवारी (दि.१६) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाटोदा-नायगाव रस्त्यावर घडली.
नशीब बलवत्तर असल्याने दुचाकीस्वार जनार्धन तुकाराम पांचाळ (४९ ,रा. बकवालनगर) यांचा थोडक्यात जीव वाचला. पांचाळ यांची सांगितल्यानुसार, त्यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. मजुरांना वाल्मीत कामावर सोडून ड्रील मशीन आणण्यासाठी ते एकटेच दुचाकीने पाटोदा-नायगाव मार्गे बकवालनगरकडे चालले होते. या निर्जन पांदीतून जातांना उसाच्या फडातून अचानक बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली. मात्र दुचाकी वेगात असल्याने बिबट्याचा नेम चुकला तर नियंत्रण सुटल्याने पांचाळ दुचाकीवरुन खाली पडले. त्यामुळे पांचाळ यांची भीतीने गाळण उडाली.
अन् बिबट्याने धूम ठोकली
पांचाळ पडताना ॲक्सीलेटर अचानक वाढले व दुचाकी रेस होऊन आवाज झाला. त्यामुळे बिबट्या घाबरून पाटोद्याच्या दिशेने वळला. दुचाकी जागेवरच सोडून पांचाळ जीवाच्या आकांताने नायगावच्या दिशेने पळत सुटले. जवळपास अर्धा किलोमीटर पळाल्यानंतर दम लागल्याने ते थांबले. या घटनेची माहिती मित्र ज्ञानेश्वर वनारसे यांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांना कळविले.
वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी
नायगाव व बकवालनगरातील सलीम शेख, शंकर राठोड, रावसाहेब भुजंग, राम जाधव, राजु मिठे आदींनी जनार्धन पांचाळ यांना सोबत घेऊन वाळूज पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वन विभागशी संपर्क साधल्यानंतर सायंयकाळी वनपाल सतीश काळे, वनरक्षक आर. एच. मुळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पांचाळ यांच्याकडून माहिती घेतली.