ताशांचा आवाज... गणपती माझा नाचत आला
By Admin | Published: September 6, 2016 01:04 AM2016-09-06T01:04:17+5:302016-09-06T01:07:45+5:30
औरंगाबाद : ‘सुखकर्ता-दु:खहर्ता’ अशा गजाननाचे सोमवारी घरोघरी आगमन झाले. ढोल-ताशांचा निनाद, ‘गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयजयकाराने सर्व गणेशभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.
औरंगाबाद : ‘सुखकर्ता-दु:खहर्ता’ अशा गजाननाचे सोमवारी घरोघरी आगमन झाले. ढोल-ताशांचा निनाद, ‘गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयजयकाराने सर्व गणेशभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. घरचा गणपती असो वा सार्वजनिक गणेश मंडळाचा; पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजा करून गणाधिपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्याने ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे’ असेच वातावरण निर्माण झाले होते. यंदा जायकवाडी धरण १०० टक्के भरू दे, अशी प्रार्थना सर्वांनी मनोमन केली.
गणेशोत्सव म्हणजे लोकोत्सव... पुढील १० दिवस हा जोश, जल्लोष शहरात पाहण्यास मिळणार आहे. सोमवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी गणेशभक्त पहाटेपासूनच बाजारात दाखल झाले होते. मनपसंत मूर्ती खरेदीसाठी प्रत्येकाची लगबग सुरू होती. दुसरीकडे शहराचे ग्रामदैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरात सकाळी १०.३० वाजता गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा.चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आदींच्या हस्ते आरती झाली आणि शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर सावरकर चौक येथील गणेश महासंघ उत्सव समितीच्या कार्यालयात गणरायाच्या मूर्तीची स्थापना व आरती लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आली. शहरात सर्वत्र गणपतीमय वातावरण निर्माण झाले होते. शहराच्या चोहोबाजूंनी ढोल-ताशांचा दणदणाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयजयकार ऐकू येत होता. मूर्ती खरेदीसाठी जिल्हा परिषद मैदानावर गणेशभक्तांची झुंबड उडाली होती. घरगुती गणेशमूर्ती खरेदी केल्यावर त्या मूर्तीवर वस्त्र टाकून घरी नेल्या जात होत्या. अनेक जण पारंपरिक वेशभूषेत गणरायाला घेण्यासाठी येत होते. नेहरू शर्ट, धोतर, डोक्यावर पांढरी टोपी, हातात छोटा पाट, त्यावर मूर्ती ठेवून सहपरिवार गणरायाला घरी नेत होते. काही तरुणीही खास महाराष्ट्रीयन पद्धतीने साडी नेसून आल्या होत्या. अवघ्या ४ इंचांपासून ते अडीच फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती घरी स्थापनेसाठी नेल्या (पान ५ वर)
गणेश महासंघ समितीच्या गणपतीची स्थापना
९२ वर्षांची परंपरा असलेल्या गणेश महासंघ उत्सव समितीच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. खा.चंद्रकांत खैरे, आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली. आ. संजय शिरसाट, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, कार्याध्यक्ष शिवनाथ राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख व पदाधिकाऱ्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
गणरायासाठी बंगळुरू, हुबळीहून आली फुुले
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बंगळुरू, हुबळी, मुदखेड, परभणी, परतूर, नगर व शिर्डी या भागातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाली. दिवसभरात सुमारे ४० टन फुले बाजारात विक्रीला आली. विशेष म्हणजे यात ९० टक्के फुले परबाजारपेठेतून आली होती. खास बंगळुरूहून मागविण्यात आलेली शेवंती ३०० रुपये किलोप्रमाणे विक्री झाली. हुबळी येथील रंगीत काकडा ६०० रुपये तर मुदखेडचा पांढऱ्या रंगातील काकडा झेला ५०० रुपये किलोने विक्री झाला. निशिगंध २०० रुपयांप्रमाणे विकला. शिर्डीहून आलेला गुलाबही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
शिवनंदना ले लो हमारी वंदना; मेळ्यात नमन
संस्थान गणपती मंदिर येथे सकाळी भीमदर्शन गणेश मेळा व मनोरंजन गणेश मेळ्यातील बालकलाकारांनी गणेश नमन सादर केले. मागील ६६ वर्षांपासून भीमदर्शन गणेश मेळा सुरू आहे. या मेळ्याचे अध्यक्ष पूनमचंद जावळे यांचा पोलीस आयुक्तांनी सत्कार केला.
यानंतर मनोरंजन गणेश मेळ्यातील बालकलाकारांनी ‘करने आये पूजा तुम्हारी तूही एक प्रेरणा, स्वीकार करलो नमन हमारा, नंदना नंदना गौरी नंदना’ हे गणेश नमन नृत्य करीत सादर केले. शायर डॉ. एम. डी. संकपाळ (बाबा हिंदुस्थानी) व शायर अशोक शिरसाट यांनी शायरी सादर केली. मात्र, हा बालगणेश मेळा बघण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी हजर नव्हता. फक्त २५ नागरिक मेळा बघण्यासाठी हजर होते.
गजानन महाराज मंदिर परिसरात अलोट गर्दी
श्री गजानन महाराज मंदिर परिसर सोमवारी गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. कडा आॅफिसच्या प्रांगणातील गणेश महासंघाच्या बाजारपेठेसह पुंडलिकनगर ते जयभवानीनगरपर्यंत ३०० हून अधिक ‘श्रीं’च्या मूर्ती विक्रीची दुकाने लागली होती. १०० रुपयांपासून ते २१ हजार रुपयांपर्यंत ‘श्रीं’च्या मूर्ती बाजारपेठेत होत्या.
कडा आॅफिस येथे गणेश महासंघाने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बाजारपेठेत ५६ पत्र्यांच्या शेडमध्ये मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. शिवाय ८० लहान शेड तेथे होते.
सेव्हन हिल्सचा रस्ता एका बाजूने भुयारी गटारीच्या कामामुळे बंद होता. गणेशोत्सव तोंडावर आल्यानंतर त्या रस्त्याचे काम पालिकेने हाती घेतले. पुंडलिकनगर ते सेव्हन हिल्स असा एल आकारातील पूर्ण १ कि़मी.चा रस्ता मधोमध उखडून ठेवला आहे. त्या रस्त्याचे काम आज सुरू होते. त्या उखडलेल्या रस्त्याच्या बाजूलाच श्रींच्या स्थापनेसाठी लागणारे साहित्य व मूर्तींची विक्रीची दुकाने होती. एकतर्फी वाहतुकीमुळे रस्त्यावर दिवसभर कोंडी होती. वाहतुकीची कोंडी आणि खड्डेयुक्त रस्त्यातून बाप्पांच्या मिरवणुका निघाल्या.
छावणी महासंघातर्फे विविध कार्यक्रम
छावणी गणेश महासंघाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर कच्छवाह यांनी सांगितले की, ७ रोजी सकाळी १० वाजता वृक्षारोपण रॅली काढण्यात येणार आहे. ८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कुस्ती व १० रोजी दुपारी ३ वाजता महिला व पुरुष गटासाठी हॉकी स्पर्धा होईल. ११ रोजी दुपारी ४ वाजता ढोल पथकांची स्पर्धा तर १२ रोजी सकाळी १० वाजता महिलांसाठी रांगोळी, मेंदी, संगीत खुर्ची, दोरीवरच्या उड्या, चमचा लिंबू स्पर्धा, लहान मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस व डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहे. १३ रोजी सकाळी १० वाजता शालेय मुला व मुलींसाठी वक्तृत्व, चित्रकला, निबंध व पथनाट्य स्पर्धा, १२ ते १४ दरम्यान मंडळांनी तयार केलेल्या सजीव व निर्जीव देखावा स्पर्धेचे निरीक्षण. १६ रोजी दुपारी ३ वाजता श्री विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. १८ रोजी छावणी गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
सिडको-हडकोत उत्साहपूर्ण वातावरण
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने सोमवारी सिडको-हडको परिसर दुमदुमून गेला. टीव्ही सेंटर, आविष्कार कॉलनी इ. ठिकाणे गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांनी सजली होती. या ठिकाणी सकाळपासूनच गणेशभक्तांनी गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी केली. गणरायाचा जयघोष आणि गुलालाची उधळण करीत जाणाऱ्या गणेशभक्तांमुळे दिवसभर उत्साहपूर्ण वातावरण होते.
टीव्ही सेंटर, आविष्कार कॉलनी आदी ठिकाणे आरास साहित्य, गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या गर्दीने फु लून गेले होते. मुहूर्तावर गणरायाची विधीवत स्थापना करण्यासाठी बहुतांश जणांनी सकाळच्या वेळेत खरेदीस प्राधान्य दिले. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, जय मल्हार, शंकर रूपातील, सिंहासनाधीश गणराय या गणेशमूर्तींना विशेष मागणी होती. कुटुंबासह, लहान मुलांसह गणेशमूर्ती खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक दिसून आली. ‘हीच मूर्ती घ्या’ असा हट्टही मुले करत होती. किमती वाढल्याने बजेटमध्ये मात्र आकर्षक मूर्ती खरेदी करण्याकडे सर्वांचा कल होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाहणी केल्यानंतरच खरेदी केली जात होती. घरगुती गणपतीसाठी अनेकांनी ५१ ते ३०१ रुपयांपर्यंतच्या मूर्ती घेतल्या.
गणेशमूर्तींसह सजावटीचे साहित्य खरेदी करण्यात आले. थर्माकोलचे आकर्षक मखर, लायटिंग, आकर्षक झिरमिळ्या खरेदी करण्याकडे कल होता. पूजेचे साहित्य, प्रसाद विक्रीच्या दुकानांवर भाविकांची गर्दी दिसून आली. भाविकांच्या गर्दीमुळे वाहनधारक अन्य मार्गांनी जाण्यास प्राधान्य देत होते. या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लहान मूर्ती शिल्लक,
मोठ्या मूर्तींचा तुटवडा
यंदा गल्लीबोळात गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. मागणीपेक्षा मूर्तींची संख्या जास्त झाल्याने ४० टक्के लहान मूर्ती शिल्लक राहिल्या. मात्र, जि.प. मैदानावर मोठ्या मूर्तींचा तुटवडा जाणवल्याने रात्री सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ झाली. दुप्पट भावात मूर्ती खरेदी कराव्या लागल्या.
शहरात लहान व मध्यम आकाराच्या सुमारे तीन ते साडेतीन लाख गणेशमूर्ती विक्री होतात. मात्र, शहरात चार ते साडेचार लाख मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्ती होत्याच शिवाय पेण, अमरावती, नगर या भागांतूनही मोठ्या प्रमाणात मूर्ती विक्रीसाठी आल्या होत्या. नवख्या विक्रेत्यांनीही मूर्ती विक्रीचे स्टॉल लावले होते. दरवर्षी जिल्हा परिषद मैदान, गजानन महाराज मंदिर, टीव्ही सेंटर इ. परिसरात गणेशमूर्तीची विक्री होत असे. मात्र, यंदा कॉलनी-कॉलनींमध्ये मूर्ती विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकीची विभागणी झाली. त्याचा फटका मूर्ती विक्रीलाही बसला.
जि.प. मैदानावरील जुन्या विक्रेत्यांना या परिस्थितीचा अंदाज आल्याने त्यांनी दुपारनंतर लहान मूर्तीचे भाव कमी करून विक्री केली. मात्र गजानन महाराज मंदिर रोड, आविष्कार कॉलनी रोड, टीव्ही सेंटर, बजरंग चौक, सिडको एन-७, जवाहर कॉलनी, शिवाजीनगर, रेल्वेस्टेशन रोड इ. भागात रात्री फेरफटका मारला असता बहुतांश स्टॉलवर ४० टक्के मूर्ती शिल्लक होत्या. जिल्हा परिषद मैदानावर १५ टक्के लहान मूर्ती शिल्लक असल्याचे आढळून आले.