साहित्यात वंचितांचा आवाज हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:04 AM2018-02-12T00:04:00+5:302018-02-12T00:04:06+5:30
समीक्षकांच्या लेखी मोठा लेखक होण्यासाठी अभिजन वर्ग केंद्रस्थानी ठेवून कलात्मक लिखाण करण्याऐवजी समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून त्यांचे वास्तव साध्या सोप्या भाषेत सांगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समीक्षकांच्या लेखी मोठा लेखक होण्यासाठी अभिजन वर्ग केंद्रस्थानी ठेवून कलात्मक लिखाण करण्याऐवजी समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून त्यांचे वास्तव साध्या सोप्या भाषेत सांगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे रविवारी (दि.११) त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
‘मसाप’च्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते देशमुखांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, गणेश मोहिते आणि रामचंद्र काळुंखे उपस्थित होते.
‘कलावाद किंवा कलात्मकतेचा विनाकारण अवडंबर माजवू नये. साहित्याने ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना देशमुखांनी मानवी जीवनात साहित्याचे महत्त्व विशद केले. न्या. चपळगावकर यांनी साहित्य संमेलनाच्या उत्सवी स्वरुपावर टीका करताना विचारपीठाची संकल्पना मांडली. अध्यक्षांनी भाषणातून मराठी भाषेच्या स्थितीविषयी आग्रहाने बोलावे. मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली.
गुणांवर प्रकाश
गणेश मोहिते यांनी देशमुखांच्या साहित्याचा आढावा घेताना त्यांच्या कथेच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. ‘कोणत्याही विषयावर संशोधन आणि चिंतन केल्यानंतर जे कथाबीज सापडेल त्यावर दर्जेदार साहित्य निर्माण करणारे देशमुख प्रबोधनाच्या अंगाने लिहितात. उद्याचे जग कसे असेल व असले पाहिजे याविषयी त्यांच्या लिखाणातून प्रतिबिंब उमटते’, असे ते म्हणाले. काळुंखे म्हणाले की, धर्माची चौकट मोडून बाहेर पडणाºया मोजक्या लेखकांमध्ये देशमुखांचा समावेश आहे. देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय विषय आणि राजकारण मराठी साहित्यात उतरविण्याचे श्रेय त्यांना जाते.