मराठवाड्यातील नगरपालिकांचे स्रोत आटले
By Admin | Published: May 21, 2016 12:08 AM2016-05-21T00:08:28+5:302016-05-21T00:14:02+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील ग्रामीण भागात ज्याप्रमाणे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तशीच परिस्थिती शहरी भागातही निर्माण झाली आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील ग्रामीण भागात ज्याप्रमाणे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तशीच परिस्थिती शहरी भागातही निर्माण झाली आहे. विभागातील नगरपालिका क्षेत्रातील जलस्रोत आटले असून, टँकरद्वारेच नगरपालिकांना नागरिकांना पाणीपुरवठा करावा लागतो आहे. टँकरसाठी अतिरिक्त निधी उभा करणे हे नगरपालिकांना जड जात आहे.
नगरपालिकांच्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था होत असली तरी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. ४० कि़ मी. लांब किंवा त्याहून अधिक दूरवरून टँकर भरण्यात येत आहेत. त्यामुळे टँकरचा खर्च वाढू लागला आहे. जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर नगरपालिका परिसरात पाण्याची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
नगरपालिकांचे पाणीपुरवठा करण्याचे पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होत आहे. उदगीर नगरपालिकेला ४० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लोहा, मुखेड, भोकर, माहूर, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, औसा, चाकूर, जळकोट, शिरूर अनंतपाळ, देवणी, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, कळंब या नगरपालिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे.
जवळपास सर्वच नगरपालिकांचे स्रोत आटले आहेत. तर काही पालिकांच्या जलस्रोतात आठ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धारूर, केज, निलंगा, अहमदपूर, चाकूर, जळकोट, कळंब व परंडा नगरपालिकांमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कन्नड, पूर्णा, मानवत नगरपालिकांना ८ दिवसांआड तर वैजापूर, गंगापूर, देगलूर, लोहा, भोकर, माहूर, गेवराई, कंधार या नगरपालिकांना चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यातील ५३ नगरपालिकांच्या पाणीटंचाईचा आराखडा नगरपालिका प्रशासनाने केला होता. मात्र, पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे पाणीपुरवठा करायचा कसा, याचे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.