पावसाने उघडीप दिल्याने पेरणी लांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:02 AM2021-06-21T04:02:17+5:302021-06-21T04:02:17+5:30
करमाड : मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाय रोहिणी नक्षत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. सलग १५ दिवस ...
करमाड : मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाय रोहिणी नक्षत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. सलग १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत राहिल्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीकडे कल वाढला, परंतु मागील दहा-बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्या असून ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांच्यावर देखील दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
१० जूनपर्यंत औरंगाबाद तालुक्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची नोंद झाली. १० जूनपर्यंत सरासरी पर्जन्यमान ४७.५ मिमी आहे. मात्र १० जूनपर्यंत ९६.३ मिमी एवढा म्हणजे सरासरीच्या १०६.५ % अशी पावसाची नोंद आहे. जास्त पावसामुळे शेती मशागतीची कामेदेखील खोळंबली होती; मात्र १० जूननंतर औरंगाबाद तालुक्यातील पूर्व भागात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण वेळेवर लागवड झाली नाही तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. मागील दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीचा विपरित परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांना दोन पैशांचा फायदा होईल अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.
दुबार पेरणीचे संकट
सुरुवातीला रोहिणी नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झालेली होती. अशा शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या व लागवडी करण्यास सुरुवात केली. पेरणी करण्यासाठी अपेक्षित व ओलावा असल्याने कपाशी, मका, मूग, उडीद, तूर आदी पिकांची पेरणी किंवा लागवड या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली. मात्र १० दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने व रोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.
जास्त भाव मिळणाऱ्या पिकांकडे कल
औरंगाबाद तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात कपाशी व मका या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत होते; मात्र यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांचा कल तूर, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांकडे दिसत असून यावर्षी कपाशी पाठोपाठ मका क्षेत्राच्या लागवडीत मोठी घट होणार आहे.
फोटो ओळ
हिवरा शिवारात अंतर्गत मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी लागवड करण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशीच परिस्थिती औरंगाबाद तालुक्यातील बहुतांश गावात आहे.