साडेतीन लाख हेक्टरवर होणार पेरणी

By Admin | Published: July 16, 2014 11:55 PM2014-07-16T23:55:46+5:302014-07-17T00:27:30+5:30

हिंगोली : चातकाचा संकेतही सुरूवातीला खोटे ठरल्याने वरूण राज्याच्या आगमनासाठी रोजे, उपवास, विधी, पूजापाठ, प्रार्थना करावी लागली.

Sowing will be done on 3.5 lakh hectare | साडेतीन लाख हेक्टरवर होणार पेरणी

साडेतीन लाख हेक्टरवर होणार पेरणी

googlenewsNext

हिंगोली : चातकाचा संकेतही सुरूवातीला खोटे ठरल्याने वरूण राज्याच्या आगमनासाठी रोजे, उपवास, विधी, पूजापाठ, प्रार्थना करावी लागली. सर्वांनीच पावसासाठी धावा सुरू केल्याने मृग नक्षत्राच्या दीड महिन्यानंतर जिल्ह्यात पाऊस दाखल झाला. सध्या हलका का होईना पाऊस मागील तीन दिवसांपासून हजेरी लावित असल्याने पेरते व्हा... पेरते व्हा... असा चातकाचा मधुर आवाज कानी पडू लागल्याने शेतकरी जोमाने पेरणीला लागला आहे; परंतु यंदा पेरणीला बराच उशिर झाल्याने पिके घेण्याच्या बाबतीत शेतकरी संभ्रमात आहेत.
मागील वर्षी १२ जून रोजी आलेल्या मान्सून मध्ये सातत्य होते. पावसामुळे गतवर्षी अवघ्या १० दिवसांत पेरण्या आटोपल्या होत्या. यंदा उशिरा पाऊस दाखल झाल्याने पेरण्या लांबल्या. मृग, आर्द्रा नक्षत्र पुर्णत: कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. शिवाय पुनर्वसू नक्षत्राचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवली होती. यंदा पेरणी होईल की नाही, या चिंतेत शेतकरी होता. पुढील आठवड्यात सुरूवात होणाऱ्या अश्लेषा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा एकवटल्या होत्या; पण त्यापूर्वी वरूणराजाने उत्पादकांची हाक ऐकल्याने मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. १३ जुलैै रोजी १२.६२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
प्रामुख्याने औंढा नागनाथ तालुक्यात ३० मिमी पाऊस सर्वाधिक होता. उर्वरित तालुक्यात सरासरी १० मिमीच्या खालीच पाऊस होता. १४ जुलैै रोजी झालेला ३.७९ मिमी पाऊस कमी असला तरी मान्सूनमध्ये सातत्य राहिले. १५ जुलै रोजी देखील सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. १६ जुलै रोजी देखील समाधानकारक पाऊस झाला नसला तरी पडती भावना निर्माण झाली आहे.
आता पेरणीसाठी अधिक विलंब नुकसानकारक ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. यंदा २ लाख ३५५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार असल्याने एकूण पेरणीचा कालावधी वाढणार आहे. त्यापाठोपाठ ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाणार आहे. ,
तद्नंतर तूर २७ आणि ज्वारी १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे; परंतु १५ जुलैैनंतर मूग आणि उडीद पिकाची पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दोन्ही पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने अनुक्रमे १३ आणि १० हजार हेक्टर क्षेत्रावर कोणते पीक घ्यावे, या विचारात शेतकरी आहेत; परंतु अधिक रिस्क न घेता शेतकऱ्यांनी हळद लागवड सुरू केली असून घरचे बियाणे असलेले पीक पेरीत आहेत.
आपत्कालीन पीक नियोजन असे
१५ जुन ते ७ जुलैपर्यंत खरीप हंगामातील सर्व पिके घेता येत होती; पण पावसाने ओढ दिल्याने उत्पादकांनी पिके घेण्याबाबतीत खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण ८ ते १५ जुलैैपर्यंत मुग आणि उडीदाची पेरणी होणे आवश्यक असते. आता या पिकाचा कालावधी निघून गेल्याने उत्पादक कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सुर्यफुल आदी पिके घेवू शकतात. यापुढे देखील पाऊस लांबल्यास पेरणी करताना आंतरपिके अधिक घ्यावीत. त्यात १६ ते ३१ जुलैै- बाजरी, सुर्यफुल, तूर+सोयाबीन (+ आंतरपीक), बाजरी +तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर. १ ते १५ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी+तीळ+बाजरी, एरंडी+धने, एरंडी+तूर. १६ ते ३१ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर.
सोयाबीनची पेरणी सर्वाधिक
मागील वर्षी १२ जुन रोजी आलेल्या मान्सून पावसात पुढे सातत्य राहिल्यामुळे अवघ्या १० दिवसांत आटोपल्या होत्या खरीप हंगामाच्या पेरण्या.
यंदा मृग, आर्द्रा नक्षत्र पुर्णत: कोरडे गेल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते आभाळाकडे.
पुढील अश्लेषा नक्षत्रावर आशा एकवटल्या होत्या; पण त्यापूर्वी ऐकली वरूण राजाने हाक.
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून १३ जुलैै रोजी १२.६२ मिमी झालेला होता सर्व तालुक्यांत पाऊस .
१४ जुलैै रोजी झालेला ३.७९ मिमी पाऊस कमी असला तरी मान्सूनमध्ये सातत्य राहिल्याने १५ जुलै रोजी पावसाची रिमझिम असताना झाला २.२ मिमी पाऊस.
जिल्ह्यात अजून कोठेही समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी आता पेरणीसाठी अधिक विलंब नुकसानकारक ठरणार असल्याने आहे त्या ओलीवर शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरूवात.
१५ जुलैैनंतर मूग व उडीद पिकाच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने अनुक्रमे १३ आणि १० हजार हेक्टर क्षेत्रावर कोणते पीक घ्यावे, या विचारात आहेत शेतकरी.
जिल्ह्यात झालेला पाऊस (मिमी)
तालुके गतवर्षी यंदा १३ जुलै १४ जुलै
हिंगोली ४२७.८७ ५२.८७ ९.७१ ०.७१
कळमनुरी ३४८.८८ ४०.४२ ६.१७ ४.०५
सेनगाव ३६२.२६ ५८.८३ ८.५० ०.६७
वसमत ३८१.७५ ५५.८६ ८.७१ ८.२९
औंढा ना. ४६२.८७ ९३.२५ ३०.० ५.२५
एकूण ३९७.१३ ६०.६१ १२.६२ ३.७९

Web Title: Sowing will be done on 3.5 lakh hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.