७१ टक्के क्षेत्रावर होणार सोयाबीनचा पेरा
By Admin | Published: June 6, 2016 12:07 AM2016-06-06T00:07:24+5:302016-06-06T00:26:00+5:30
लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार
लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार असल्याचा कृषी विभागाचा निष्कर्ष असून, केवळ २९ टक्के क्षेत्रावर अन्य पिके घेतली जातील. त्यामुळे कृषी विभागाने सोयाबीनच्या बियाणांबाबत तसेच खताच्या पुरवठ्याचे नियोजन केले असून, २.५८ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार आहेत.
लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रापैकी ३ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. ५ लाख ५६ हजारांपैकी ३ लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. ७१ टक्के क्षेत्र सोयाबीनने व्यापणार आहे. केवळ २९ टक्के क्षेत्रावर तूर, मूग, उडीद, साळ, हायब्रीड ज्वारी, सूर्यफुल, तीळ, भुईमूग, लहान कारळ, पिवळी ज्वारी आदी पिके घेतली जाणार आहेत. हायब्रीड ज्वारी ७५ हजार हेक्टर, तूर १ लाख १ हजार हेक्टर, मूग २० हजार, उडीद ११ हजार आणि कापूस २ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. पण सोयाबीनचा पेरा तब्बल ३ लाख ९७ हजार हेक्टर होणार आहे. या खरीप पिकासाठी ऐनवेळी शेतकऱ्यांची धावपळ होऊ नये म्हणून बियाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. एकूण बियाणे २.५८ लाख क्विंटल लागणार आहेत.
या बियाण्यात गतवर्षीचे सोयाबीन ३० टक्के बियाणे म्हणून उपलब्ध होईल. १.३० लाख शेतकऱ्यांकडून बियाणे उपलब्ध होतील. तर विविध कंपन्यांकडून १.२९ लाख बियाणे उपलब्ध होत आहेत. महाबीजकडून ८० हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्यापैकी ६५ हजार क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहेत. अन्य कंपन्यांकडूनही बियाणे उपलब्ध होत असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रबी हंगामातील ४२ टन खत शिल्लक असून, तो खरीप हंगामासाठी वापरता येणार आहे. शिवाय, या हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक टन खत मंजूर झाला असून, रबी व या हंगामातील मिळून १ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खताची या हंगामात कसलीही कमतरता भासणार नाही, असेही जिल्हा विकास कृषी अधिकारी रणदिवे यांनी सांगितले.
सोयाबीन बियाणासाठी महाबीजची एक बॅग २५०० रुपयाला असून, महाबीज गुजरात २३५० रुपये, महाबीज गुजरात २७०० रुपये, रायझिंग सीडस् २५५०, एमटीके यशोदा २५०० रुपयाला उपलब्ध आहे. ही एमआरपी किंमत असून, या एमआरपी किंमती पाहूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावेत. त्याची पावती विक्रेत्यांकडून हस्तगत करावी. सोयाबीन उगवेपर्यंत ती जपून ठेवावी. काही तक्रार असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक खताची गरज आहे. परंतु, रबी हंगामातील ४२ हजार मेट्रिक टन आणि यंदा या हंगामासाठी ९१ हजार ४०० मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आला आहे. एकूण १ लाख ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झालेला आहे. गरजेपेक्षा ४६ हजार मेट्रिक टन खत आपल्याकडे अधिकचा आहे. त्यामुळे खत टंचाई यंदा उद्भवणार नाही, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.