सोयाबिन बियाणांना निकृष्टतेचे ग्रहण

By Admin | Published: November 15, 2014 11:46 PM2014-11-15T23:46:21+5:302014-11-15T23:56:01+5:30

परभणी : विविध कंपन्यांकडून विकत घेतलेले सोयाबिनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.

Soybean Seeds Eclipse Depression | सोयाबिन बियाणांना निकृष्टतेचे ग्रहण

सोयाबिन बियाणांना निकृष्टतेचे ग्रहण

googlenewsNext

परभणी : विविध कंपन्यांकडून विकत घेतलेले सोयाबिनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाभरातून अशा २१६ तक्रारी दाखल झाल्याने सोयाबिनच्या बियाणांना निकृष्टतेचे ग्रहण लागल्याचीच स्थिती आहे.
यावर्षी निसर्गाने अवकृपा केली. त्यामुळे जिल्ह्याची पीकपरिस्थिती अतिशय नाजूक आहे. खरीप आणि रबी असे दोन्ही हंगाम धोक्यात आल्याने पिकांचे थोडेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. कापूस आणि सोयाबिन ही जिल्ह्यातील मुख्य पिके आहेत. परंतु या दोन्ही पिकांचा उतारा अत्यल्प निघाला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात गुरफटला आहे. निसर्गाच्या या संकटासमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना मानव निर्मित संकटाचाही सामना करावा लागत आहे.
मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा सोयाबिनकडे कल वाढला आहे. कापसाकडे पांढरे सोने म्हणून पाहिले जात असले तरी सोयाबिनचे पीक नगदी पिक म्हणून पुढे येत आहे. त्यातूनच सोयाबिनचा पेरा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला. बहुतांश शेतकऱ्यांचा कल सोयाबिनकडे झाला आहे. सोयाबिनसारख्या पिकातून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन इतर पिकाची कसर या पिकात काढली जाते. त्यामुळे सोयाबिनचे बियाणे घेताना शेतकरी सहसा तडजोड करीत नाही. चांगल्या कंपनीचे बियाणे जास्त पैसे मोजूनही तो खरेदी करतो. यावर्षी सोयाबिनच्या बियाणांचा चांगलाच तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी कंपनीचे बियाणे विकत घेतले. परंतु हे बियाणे मात्र उगवले नसल्याचेच आता समोर येत आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सोयाबिन बियाणे उगवले नसल्याच्या २१६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रार करणाऱ्यांच्या सोयाबिन बॅगची संख्या तब्बल ६०४ एवढी आहे. २४१.६ हेक्टरवरील सोयाबिन उगवण शक्ती कमी झाल्याने धोक्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबिनच्या बियाणांना ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे. गंगाखेड तालुक्यातून सोयाबिन बियाणांविषयी सर्वाधिक ५३ तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. मानवत तालुक्यातील केवळ चार तक्रारी आहेत.
जिल्ह्यात सरासरी २ पोत्याचा उतारा सोयाबिनला आला आहे. परंतु या २१६ तक्रारकर्त्यांचे मात्र बियाणेच उगवले नसल्याने उत्पन्नही मिळालेले नाही. त्यामुळे सोयाबिन पिकासाठी केलेल्या खर्चावर पाणी सोडण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी विभागाने या सर्व तक्रारींचे पंचनामे केले असून, हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. परंतु त्यातून शेतकऱ्यांना कितपत मदत मिळते, हाही प्रश्नच आहे.
जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे़ शेतीतून उत्पन्न मिळाले नसल्याने वर्षभराचे आर्थिक गणित जुळविण्यात गुंतला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Soybean Seeds Eclipse Depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.