सोयाबीनचा पेरा वाढला पण उत्पादनात घट
By Admin | Published: October 29, 2015 12:08 AM2015-10-29T00:08:18+5:302015-10-29T00:23:11+5:30
सोमनाथ खताळ , बीड यावर्षी सोयाबिनच्या पिकाची निम्याने आवक घटल्याचे चित्र जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून येत आहे. आवक घटल्याने किंमतीत ३०० रूपयांनी वाढ झाली आहे.
सोमनाथ खताळ , बीड
यावर्षी सोयाबिनच्या पिकाची निम्याने आवक घटल्याचे चित्र जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून येत आहे. आवक घटल्याने किंमतीत ३०० रूपयांनी वाढ झाली आहे. परंतु ही भाववाढ शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसल्याचे दिसून येते. गतवर्षीच्या तुलनेत पेरा वाढला परंतु उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पीकांची वाढ खुंटली. खरीपाची पीके पावसाअभावी वाया गेली. सोयाबीनचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जिल्ह्यात यावर्षी १ लाख ७१ हजार हेक्टरव सोयाबीनचा पेरा झाला होता. परंतु मध्यतंरी पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली आणि उत्पादनात घट झाली. गतवर्षीपेक्षा यावर्षी १८ हजार हे. सोयाबीनचा पेरा वाढल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसते.
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनला जास्त भाव मिळत आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३५०० ते ३८०० रू. प्रति क्विंटल भाव मिळत असल्याचे कृउबा सचिव आर.पी.बहिर यांनी सांगितले.
अपेक्षेप्रमाणे आवक सध्यातरी असल्याचे व्यापारी बद्रीनारायण जाजू यांनी सांगितले. आवक वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत आता शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे हमालांच्या हाताला काम मिळू लागले आहे.