सोयगाव न.प. निवडणुकीला कोरोनाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:05 AM2021-03-07T04:05:01+5:302021-03-07T04:05:01+5:30
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाने गती घेतली. प्रारूप मतदार याद्या आणि अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम निवडणूक ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाने गती घेतली. प्रारूप मतदार याद्या आणि अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला होता. परंतु पुन्हा कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्धीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. प्रभागातील इच्छुकांनी गाठीभेटी सुरू केल्या होत्या. राजकीय पक्षांनीही पूर्वतयारी हाती घेतली होती. त्यामुळे निवडणुकांचे तापलेले वातावरण पुन्हा थंडावले आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना यांच्यात निवडणुकीआधीच राजकीय जुगलबंदी रंगली होती. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली, तर भाजपाच्यावतीने केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीपूर्वी सोयगावला पहिला दौरा आटोपला होता. परंतु अचानक कोरोना संसर्गाची नजर नगरपंचायतीला लागली.