सोयगाव तालुक्यात ११४ पाझर तलाव कोरडे ठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:05 AM2021-03-19T04:05:47+5:302021-03-19T04:05:47+5:30
सोयगाव : तालुक्यात विविध विभागांत ११४ पाझर तलाव मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कोरडी ठाक झाल्याने पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष्य निर्माण ...
सोयगाव : तालुक्यात विविध विभागांत ११४ पाझर तलाव मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कोरडी ठाक झाल्याने पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
पाझर तलावांवर जनावरांच्या पाण्याची तहान भागत होती; परंतु सर्वच पाझर तलावे कोरडी होऊ लागल्याने सोयगाव तालुक्यात जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावर मात्र उपाययोजनांसाठी तालुका प्रशासन पुढे सरसावत नाही.
तालुक्यात जिल्हा परिषद, सिंचन, जलसंधारण, पाटबंधारे, लघुपाटबंधारे या सर्व विभागांची मिळून ११४ तलाव आहेत. मात्र, मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात या तलावांतील पाणी मृतसाठ्याच्या खाली गेले आहे. तालुक्यात ७०,१५२ लहान मोठी पाळीव जनावरांची संख्या आहे. मात्र, तलावातील पाणी आटू लागल्याने या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत पडले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाची दाहकता वाढली होती. त्यामुळे तीन आठवड्यात या तलावांना कोरडे होण्याची वेळ आली. काही भागांत तर फुटलेल्या तलावांचे पाणी चार महिन्यांपासून वाहून गेलेले आहे. त्यामुळे फुटलेल्या आणि भगदाड पडलेल्या तलावांची मात्र चार महिन्यांपासूनच दयनीय अवस्था झालेली आहे.
गळती झाली, दुरूस्तीकडे दुर्लक्ष
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टीमुळे सोयगाव तालुक्यात अनेक तलावांना गळती लागली होती. काही तलावांच्या संरक्षण भिंती फुटलेल्या होत्या. मात्र, या तलावांच्या भिंतींची दुरुस्ती करण्याची तसदीही संबंधित विभागांनी घेतली नाही. त्यामुळे अशा पाझर तलावातील पाणी चार महिन्यांपूर्वीच वाहून गेले होते.
छायाचित्र ओळ : सोयगाव परिसरात कोरडा ठाक झालेला पाझर तलाव