ई-पीक नोंदणीत सोयगाव अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:02 AM2021-08-29T04:02:02+5:302021-08-29T04:02:02+5:30
सोयगाव : शासनाच्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सोयगाव अव्वल तर सिल्लोड आणि फुलंब्री तालुके पहिल्या टप्प्यात नीचांकी असल्याचा अहवाल पुणे ...
सोयगाव : शासनाच्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सोयगाव अव्वल तर सिल्लोड आणि फुलंब्री तालुके पहिल्या टप्प्यात नीचांकी असल्याचा अहवाल पुणे भू-अभिलेख संचालनालयाने दिला आहे. विशेष म्हणजे सोयगाव तालुका हा ई-पीक पाहणी प्रकल्पात जिल्ह्यात अव्वल ठरला असल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या शेतातूनच पिकांची नोंदणी करून ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना स्वतः पिकांची ॲप्सवर नोंदणी करून फोटो अपलोड तसेच यात पीक पेरे यात नोंदवता येणार आहे. हा प्रकल्प १५ ऑगस्टपासून ते १५ सप्टेंबरपर्यंत या कालावधीसाठी आहे. यात जिल्ह्याचा पहिल्या टप्प्याचा अहवाल पुणे येथे सादर करण्यात आला असून यात महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सोयगाव अव्वल असल्याचे पुढे आले आहे. दुसरीकडे सिल्लोड आणि फुलंब्री तालुके पिछाडीवर असल्याचे अहवालात नमूद आहे. पहिल्या टप्प्यात सोयगाव तालुक्यात तब्बल १ हजार १४२ शेतकऱ्यांनी स्वतः पिकांच्या नोंदी करून त्यांच्या सातबाऱ्यांवर पुणे भू-अभिलेख संचालनालयाकडून पीक पेरे नोंदविण्यात आल्याचा अहवाल महसूल विभागाला मिळाला आहे.
सोयगावचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना थेट शेतावर पाठवून शेतकऱ्यात जनजागृती करत कार्यशाळेतील शेतकऱ्यांच्या त्रुटी दूर केल्या. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात सोयगाव जिल्ह्यात अव्वल ठरला असल्याचे पुढे आले.
----- पीक पेरे नाेंदवलेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या -----
ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू होऊन दोन आठवडे झाले. यात कन्नड तालुक्यात आतापर्यंत ७७७, सोयगावात ११४२, सिल्लोड १३०, फुलंब्री ४९, औरंगाबाद ५५४, खुलताबाद २७८, वैजापूर ५०३, गंगापूर २३६, पैठण ६४१ याप्रमाणे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अंतर्गत पीक पेरे नोंदविले आहेत.
-- कोट --
शासनाच्या ई-पीक पाहणी प्रकल्पाचे काम सोयगाव तालुक्यात गतिमान पद्धतीने करण्यात आले. यासाठी तलाठी, कृषी सहायक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये थेट शेतावर जाऊन जनजागृती केली आहे. यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने सोयगाव तालुका नोंदीत जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
- रमेश जसवंत, तहसीलदार सोयगाव