सभापती, बीडीओंमध्ये शाब्दिक ‘वॉर’
By Admin | Published: January 2, 2015 12:35 AM2015-01-02T00:35:33+5:302015-01-02T00:45:05+5:30
कळंब : शहरात एकीकडे एकमेकांवर नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना पंचायत समितीच्या कार्यालयात मात्र पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये जवळपास अर्धा तास शाब्दीक ‘वॉर’ झाला़
कळंब : शहरात एकीकडे एकमेकांवर नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना पंचायत समितीच्या कार्यालयात मात्र पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये जवळपास अर्धा तास शाब्दीक ‘वॉर’ झाला़ काही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला असला तरी अनेकांनी दिवसभर ‘हॅप्पी न्यू इअर’ म्हणत हा विषय चर्चेचा बनविला होता़
कळंब पंचायतसमितीत साहित्य खरेदीवरून सभापती छायाताई वाघमारे व काही सदस्यांमध्ये २४ डिसेंबर रोजी चांगलीच शाब्दीक चकमक झाली होती़ त्यानंतर सभापती वाघमारे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले होते़ मात्र, काही पंचायत समिती सदस्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला होता़ या घटनेला आठ दिवस लोटतात न लोटतात तोच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी सभापती छायाताई वाघमारे व प्रभारी बीडीओ विजय देशमुख या दोघांमध्ये कार्यालयातच शाब्दीक चकमक उडाली़
वाघमारे यांनी ‘कार्यालयाच्या कामकाजावेळी आपल्याला विचारल्याशिवाय एकाही फाईलीवर सही करू नका’, असे फर्मान सोडले होते़ यावर बीडीओंनी हे शक्य नसल्याचे सांगितल्याने पदाधिकारी अधिकाऱ्यांमध्ये २० ते २५ मिनिटे पंचायत समिती कार्यालयात वाद सुरू होता़ तर ग्रामीण भागातून विविध कामासाठी आलेल्या ग्रामस्थांची तारंबळ उडाली होती़ वाद वाढलेला पाहून काही पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मध्यस्थी करून वाद थांबविला़ तसेच वाद चर्चेने सोडविण्याचा सल्लाही दिला़