सभापतीपदावरून खलबते
By Admin | Published: March 25, 2017 10:59 PM2017-03-25T22:59:11+5:302017-03-25T23:01:30+5:30
बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीत बाजी मारल्यानंतर भाजपमध्ये आता सभापती निवडीवरुन हालचाली गतिमान झाल्या आहेत.
बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीत बाजी मारल्यानंतर भाजपमध्ये आता सभापती निवडीवरुन हालचाली गतिमान झाल्या आहेत. इच्छुकांची संख्या वाढल्याने श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे.
पालकमंत्री पंकजा मुुंडे यांना परळीत ‘होमपीच’वर राष्ट्रवादीकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, माजी मंत्री सुरेश धस यांच्या मदतीने त्यांनी शिवसेना व शिवसंग्राम या पारंपरिक मित्रपक्षांना सोबत घेऊन संख्याबळ जुळविले. अध्यक्षपद भाजपला तर उपाध्यक्षपद शिवसंग्रामकडे गेले आहे. १ एप्रिल रोजी जि.प. मध्ये सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली असून त्यात समाजकल्याण, महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य तसेच अर्थ व बांधकाम समितीचे सभापती निवडले जाणार आहेत. उपाध्यक्षांकडे सध्या पशुसंवर्धन व कृषी खाते आहे.
मात्र, नवनियुक्त उपाध्यक्षा जयश्री मस्के यांनी अर्थ व बांधकाम खात्यावर दावा केला आहे. या खात्यासाठी शिवसेनेचे युद्धजित पंडित हे दावेदार मानले जातात. उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असूनही आ. लक्ष्मण पवारांच्या विरोधामुळे ऐनवेळी डावलेले गेलेले युद्धजित पंडित यांनी आता वजनदार खाते पदरात पाडून घेण्यासाठी लॉबिंंग सुरु केले आहे. उपाध्यक्षा मस्के अर्थ व बांधकामवर अडून बसल्याच तर श्रेष्ठींपुढे पेच निर्माण होईल.
दरम्यान, माजी मंत्री धस गटाला एक, भाजप व शिवेसना प्रत्येकी दोन असे खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सभापतीपदासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. १ एप्रिल रोजी कोणाचे नशिब उजळते व कोणाचा हिरमोड होतो? याकडे सर्वांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)