भाजपा आमदारांच्या दिमतीला विशेष विमान
By Admin | Published: October 21, 2014 12:54 AM2014-10-21T00:54:01+5:302014-10-21T01:09:38+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातून निवडून आलेले भाजपाचे ११ आमदार सोमवारी दुपारी विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले. पक्षाने केलेली ही व्यवस्था पाहून आमदारही हरखून गेले.
औरंगाबाद : मराठवाड्यातून निवडून आलेले भाजपाचे ११ आमदार सोमवारी दुपारी विशेष विमानाने मुंबईला रवाना झाले. पक्षाने केलेली ही व्यवस्था पाहून आमदारही हरखून गेले.
राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपाने यावेळी मराठवाड्यात नेत्रदीपक यश मिळविले आहे. गतविधानसभा निवडणुकीत केवळ दोन आमदार असलेला भाजपा यंदा खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करीत मराठवाड्यातही १५ आमदार निवडून आल्याने सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. पक्षाच्या नेत्यांचे मुंबईत बैठकांचे सत्र चालूच असून पक्षाची पुढील दिशा ठरविली जात आहे. यामुळे पक्षाने नवनिर्वाचित सर्व आमदारांना मुंबईत पाचारण केले आहे. यातील काही आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यामुळे सोमवारी दुपारी पक्षाचे ११ आमदार विशेष विमानाने रवाना झाले. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे (फुलंब्री), अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), भीमराव धोंडे (आष्टी), नारायण कुचे (बदनापूर), बबनराव लोणीकर (परतूर), गोविंद राठोड (मुखेड), तानाजी मुटकुळे (हिंगोली), लक्ष्मण पवार (गेवराई), आर. टी. देशमुख (माजलगाव), संगीता ठोंबरे (केज) रवाना झाले.
या आमदारांना सोडण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, नगरसेवक अनिल मकरिये, तसेच पक्षाचे कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित होते. सोमवारी सकाळीच हे आमदार रवाना होणार होते. मात्र, विमान उशिरा आल्याने हे आमदार दुपारी रवाना झाले. पंकजा पालवे, प्रशांत बंब आणि इतर आमदार हेही मुंबईला गेले असल्याची माहिती मिळाली.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदारही मुंबईकडे शिवसेना पक्षप्रमुखांना भेटण्यासाठी रवाना झाल्याचे कळते. राज्यात सत्ता स्थापण्याच्या हालचाली चालू असून शिवसेना सत्तेत सहभागी होणार असल्यास औरंगाबाद जिल्ह्यातून कुणाची तरी वर्णी लागू शकते, यासाठीही काही आमदार तयारीत असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड सोमवारी होती, त्यासाठी पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार आधीच मुंबईकडे गेल्याची माहिती मिळाली.