ही आहे गरिबाला मोफत अन्न, कपडा देणारी न्यारी ‘बँक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 07:41 PM2019-05-31T19:41:32+5:302019-05-31T19:44:42+5:30
दररोज ५०० ते ७०० लोकांची येथे भागविली जाते भूक
औरंगाबाद : शहरात असे अनेक गरीब लोक राहतात, त्यांना एक वेळचे जेवण मिळणे कठीण असते. अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागते. अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे नसतात. अशा लोकांना पोटभर अन्न व कपडे देण्यासाठी शहरात रोटी व कपडा बँक सुरू करण्यात आली आहे. मागील ३ वर्षांपासून या बँकेचा लाभ हजारो गरीब घेत आहेत.
शहरातील एकही गरीब उपाशी झोपू नये व कपड्याविना राहू नये, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी बायजीपुरा-जिन्सी रस्त्यावर रोटी बँकेला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ कपडा बँकेलाही सुरुवात झाली. शहरात एवढी जागरूकता वाढली आहे की, कुठे लग्नकार्य अन् मंगल कार्य असले व तेथे अन्न शिल्लक राहिल्यास त्या मंगल कार्यालयातून या रोटी बँकेत आणल्या जाते. याशिवाय हॉटेलमध्ये दररोज शिल्लक राहणारे अन्न, कंपन्यांच्या कँटिनमध्ये शिल्लक राहणारे अन्न तसेच रोटी बँकेचे सदस्यही दररोज या बँकेत अन्न आणून देतात. येथे ४ हजार किलोपर्यंतचे अन्न साठविण्यासाठी शीतकरण व्यवस्था आहे. ५०० ते ७०० दरम्यान गरीब लोक येथून अन्न घेऊन जातात व आपली भूक भागवितात. तसेच कपडा बँकेतही अनेक लोक कपडे आणून देतात. तेच कपडे गरिबांना वाटले जातात. याशिवाय पाणी देणे हे महान कार्य आहे. यासाठी ‘वॉटर बँक’ही सुरू करण्यात आली आहे. दररोज शेकडो लोक शुद्ध पाणी नेत असतात. येथून प्रत्येकी २० लिटरचे ४ हजार जार पाणी दररोज वाटप करण्यात येते. संपूर्णपणे ही सेवा मोफत आहे.
दुष्काळामुळे अनेक भागात पाण्याची टंचाई आहे. येथील नागरिकांना या वॉटर बँकेचा मोठा फायदा होत आहे. याशिवाय मागील तीन वर्षांपासून दरवर्षी शेकडो रुग्णांचे मोफत मोतीबिंदूचे आॅपरेशन करण्यात येते. रोटी बँकेच्या या उपक्रमाची देशभर चर्चा झाली आहे. या संस्थेचा आदर्श घेत अकोला व पुणे येथे रोटी बँक सुरू करण्यात आली आहे. विविध ठिकाणाहून अन्न जमा करण्यासाठी मोफत दोन व्हॅन देण्यात आल्या आहेत.
दोन हजार विद्यार्थिनींनी घेतले मोफत प्रशिक्षण
गरीब विद्यार्थिनींना व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी तीन वर्षांपासून हारुण मुकाती इस्लामिक सेंटर कार्यरत आहे. यात कॉम्प्युटर कोर्स, स्पोकन इंग्लिश, शिलाई, फॅशन डिझाईन, ब्युटीपार्लर क्लासेसपासून ते पाककलापर्यंत विविध प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. आजपर्यंत दोन हजार विद्यार्थिनींनी येथे प्रशिक्षण घेतले आहे.
२३ हजार कपड्यांचे होणार वाटप
रमजाननिमित्त गरिबांना हारुण मुकाती इस्लामिक सेंटरच्या वतीने २३ हजार कपड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. डेड स्टॉकमध्ये असलेले कपडे व्यापाऱ्यांनी येथे आणून दिले आहेत. औरंगाबादसह वैजापूर, परभणी, मुंबई, सुरत, इंदोर येथील व्यापाऱ्यांनी दुकानातील कपडे आणून दिले आहेत. हे सर्व कपडे दि. १ आणि २ जून रोजी सकाळी ११ ते ५ मोफत वाटप करण्यात येणार आहेत.
चाय पे शादी
गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न पैशांमुळे अडू नये यासाठी ‘चाय पे शादी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हारुण मुकाती इस्लामिक सेंटरच्या वरच्या मजल्यावर अत्यंत साध्या पद्धतीने लग्न लावून दिले जाते. यावेळी केवळ वऱ्हाड्यांना चहा दिला जातो. मागील वर्षभरात ७० पेक्षा अधिक लग्न ‘चाय पे शादी’ या उपक्रमाद्वारे लावण्यात आले आहेत. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय वधू-वर नोंदणी केंद्राची स्थापनाही करण्यात आली आहे. याद्वारे तीन वर्षांत शेकडो लग्ने जुळविण्यात आली आहेत.