कृषी संस्कृतीमध्ये पोळ्याला विशेष महत्व
By Admin | Published: August 24, 2014 11:35 PM2014-08-24T23:35:01+5:302014-08-24T23:53:48+5:30
हिंगोली : पोळ्याच्या सणाला भारतीय कृषी संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे.
हिंगोली : पोळ्याच्या सणाला भारतीय कृषी संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. आदल्यादिवशी वर्षभर कबाड कष्ट करून थकलेल्या बैलांच्या खांदेमळण्यासाठी विशेष पाच पाणी पळसाची पाने असलेला ‘देठवा’ म्हणून वापरतात. त्याने वर्षभर केलेल्या काम केलेल्या बैलाचा थकवा नाहीसा होवून त्यांचा उल्हास वाढतो यामुळे त्यांची पुजा केली जाते.
बैलांसाठी लागणारे कासरे, दोरीसाठी पळस वृक्षापासून तयार केलेल्या दोरीचा सर्रास उपयोग केला जातो. औजारांसाठी लागणाऱ्या शिवळा सुद्धा पुर्वी पळसाच्या उपयोग केला जात होता. त्यामुळे पळसाच्याच्या झाडांच्या फांद्याची पोळ्याच्या दिवशी मेढ म्हणून प्रवेशद्वार, मंदिरामध्ये ठेवून पुजा केली जाते.
पळसाच्या मुळांपासून ताग व दोर, पानापासून द्रोण व पत्रावळी, फुलापासून रंग, पळस पापडी, त्वचा रोग औषधी उपयोगी, फुल- मुत्रविकार, डिंक - शक्तीवर्धक उपयोग, पळसाच्या झाडांवर उन्हाळ्यात सुंदर फुले येतात त्यामुळे पक्ष्यांद्वारे परागीकरण होते, आदींसाठी पळसाचा उपयोग होतो.
अशा प्रकारे मानव, बैल व पळस वृक्षांचा संबध असल्यामुळे पळस हा कलीयुगाचा कल्पवृक्ष म्हणून गणला जातो. म्हणूनच पोळा सणाच्या दिवशी सकाळीच पळसाच्या फांद्या (मेढ) मुख्य प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजुला ठेवून पुजन केले जाते. परंतु सद्या आपल्या प्रदेशात पळस वृक्ष कमी असल्यामुळे अशा प्रकारे फांद्या तोडून पुजन करण्याऐवजी प्रतिकात्मक एक पान ठेवून पुजन करावे व पळस वृक्षाची तोड थांबवून पर्यावरणास सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी चंद्रशेखर सरोदे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
यंदा पोळ्याचा सण उसणवारीवरच
भांडेगाव : हिंगोली तालुक्यातील सााटंबा येथे पोळ्याच्या सणानिमित्त वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा-राजाची गावातील मानकऱ्यांच्या हस्ते पुजा करून मंगलाष्टके म्हणून पोळ्याला सुरूवात केली जाते. शेतात वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजा आणि बळीराजाचाही पोळा हा अतिमहत्वाचा सण असल्याने दोघेही उल्हासाने या सणाची वाट पाहतात. परंतु पाऊस नसल्याने हा सण उसणवारीवरच साजरा करावा लागत आहे.
पोळा हा सण उसणवारीवर का होईना पण चांगल्या प्रकारे साजरा केला जात असल्याचे चित्र आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना धुवून बेगड लावली जाते. फुगे, घागरमाळा, झुल आदी प्रकारच्या साहित्याने सजवून बैलांना हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून दर्शनास आणल्या जाते. त्यानंतर गावातील मानकऱ्यांच्या हस्ते त्यांची पूजा केल्या जाते. त्या ठिकाणी अगदी लग्न समारंभाप्रमाणे सजवलेल्या मंडपात उभे करून पाच मंगलाष्टक म्हणून अक्षता टाकल्या जातात. त्यामुळे या दिवसाला एका लग्नसमारंभासारखेच महत्व प्राप्त होते. पाच मंगलाष्टक झाल्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीनंतर समोर भजनी मंडळीसह बैलांची प्रत्येक घरी पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य चारल्या जातो. अशा प्रकारे बैलांसह गावातून पाच फेऱ्या मारल्या जातात. यावर्षी साटंबा येथे विनाबंदोबस्त पोळा साजरा करण्याचा संकल्प महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सीताराम घ्यार यांनी केला आहे.(वार्ताहर)