औरंगाबाद जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ३० आॅक्टोबरला
By Admin | Published: October 22, 2014 12:30 AM2014-10-22T00:30:22+5:302014-10-22T01:20:52+5:30
औरंगाबाद : विषय समिती सभापतीच्या विभाग निवडीसाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ३० आॅक्टोबर रोजी बोलावण्यात आली आहे.
औरंगाबाद : विषय समिती सभापतीच्या विभाग निवडीसाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ३० आॅक्टोबर रोजी बोलावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी एक वाजता सभेला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दि.२१ सप्टेंबर रोजी निवडणूक झाली होती, तर सभापतीपदाची निवड दि.१ आॅक्टोबर रोजी झाली. या दोन्ही निवडणुका विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा अंमल सुरू असताना पार पडल्या. त्यामुळे नवनियुक्त अध्यक्ष श्रीराम महाजन व समाजकल्याण सभापती शीला चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती सरला मनगटे, सभापती विनोद तांबे व संतोष जाधव यांच्यासह सर्वच सदस्य प्रचारात व्यस्त होते. प्रचारातील व्यस्ततेमुळे हे पदाधिकारी जिल्हा परिषदेत येत नव्हते. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह विनोद तांबे व संतोष जाधव यांना अद्याप विषय समित्या ठरवून देण्यात आलेल्या नाहीत.
सर्वसाधारण सभेने या समित्या ठरवून द्याव्या लागतात. त्यासाठी दि.३० आॅक्टोबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. समाजकल्याण व महिला व बालकल्याण समिती वगळता, पशुसंवर्धन व कृषी, जलव्यवस्थापन, आरोग्य व शालेय शिक्षण समिती आणि बांधकाम व अर्थ या समित्यांचे वाटप सभापतींना करण्यात येणार आहे. परंपरेप्रमाणे अध्यक्ष हे जलव्यवस्थापन समिती स्वत:कडे ठेवतात, तर पशुसंवर्धन व कृषी हे उपाध्यक्षाच्या वाट्याला जातात. आघाडीतील समझोत्यानुसार बांधकाम- अर्थ समिती आणि आरोग्य- शालेय शिक्षण या समित्या मनसेच्या वाट्याला गेल्या आहेत; परंतु मनसेला यावेळेस समाजकल्याण समिती देण्यात आली आहे. त्यामुळे उपरोक्त दोन समित्यांपैकी मनसेकडील एक समिती काँग्रेसचे विनोद तांबे यांना दिली जाईल.