विशेष दुरुस्तीचे १७ प्रस्ताव मंजूर
By Admin | Published: March 15, 2016 12:47 AM2016-03-15T00:47:45+5:302016-03-15T01:00:08+5:30
हिंगोली : जिल्ह्यात आता टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्यानंतर वाढलेली ओरड लक्षात घेता प्रशासनही कामाला लागले आहे.
हिंगोली : जिल्ह्यात आता टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्यानंतर वाढलेली ओरड लक्षात घेता प्रशासनही कामाला लागले आहे. त्यामुळे टंचाईतील विशेष दुरुस्तीचे जवळपास ४0 लाख रुपये किमतीचे १७ विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील जवळपास २३ गावांतील पूरक योजना व दुरुस्तीचे प्रस्ताव टंचाईमध्ये जिल्हा कचेरीत दाखल करण्यात आले होते. यापूर्वीही प्रस्ताव आलेले असताना ते त्रुटीत निघाल्याने परत पाठविले होते. यंदा प्रथमच जिल्हा परिषदेने पाणीपुरवठा विभागाला मिळालेल्या देखभाल व दुरुस्तीत काही गावांचे प्रस्ताव मार्गी लावले. त्यामुळे मध्यंतरी होणारी ओरड थांबली होती. तरीही टंचाईमुळे अनेक गावांतील दुरुस्ती व इतर कामे निघतच आहेत. त्यात एकूण २३ प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने जिल्हा कचेरीकडे दाखल केले होते. त्यापैकी १७ प्रस्तावांना मंजुरी दिली. यातीलही दोन प्रस्तावात सुधारित अंदाजपत्रके सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
यामध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावांत कळमनुरी तालुक्यातील अप्पादेववाडी, चिखली नवीन, खरवडा, जटाळवाडी, चुंचा या गावांचा समावेश आहे. तर औंढ्यातील पेरजाबाद नालेगाव, हिंगोली तालुक्यातील पारडा, धानोरा बं., सेनगाव तालुक्यातील माळसापूर खुटाडी, वाघजाळी, सोनसावंगी, पिंपरी बर्डा, ब्रह्मवाडी, वाढोणा या गावांचा समावेश आहे. हिंगोली तालुक्यातील लोहरा व अन्य एका गावाचा सुधारित प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले आहे.
पालकमंत्री दिलीप कांबळे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी ४0 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणच्या लोकांना अधिग्रहणाची रक्कम मिळाली नसल्याची ओरड आहे. काहींची तर गतवर्षीची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे यंदा अनेकांनी विहीर, बोअर अधिग्रहण करताना वाद घालण्याचे प्रकारही केले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)