'फेक न्यूज, द्वेषपूर्ण पोस्ट'वर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथके स्थापन
By सुमित डोळे | Published: March 28, 2024 06:19 PM2024-03-28T18:19:03+5:302024-03-28T18:19:18+5:30
फॉरवर्ड करणाऱ्यासह ग्रुप 'ॲडमिन'देखील जबाबदार, कमेंट करून प्रोत्साहन देणाऱ्यांवरही लक्ष
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'फेक न्यूज'चे वारेही जोरात वाहू लागले आहे. राजकीय पक्ष, नेत्यांच्या नावाने खोट्या बातम्या प्रसारित करणे, दाेन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असे खोटे वृत्त प्रकाशित करणाऱ्या टोळ्या सक्रिय होतात. यावेळी असे प्रकार करणाऱ्यांवर पोलिस, निवडणूक आयोगाने थेट गुन्हा दाखल करण्याची कठोर भूमिका घेतली आहे.
सोशल मीडियातून खोट्या बातम्या, द्वेषपूर्ण माहितीच्या लिंक सहज फॉरवर्ड, शेअर केल्या जातात. साेशल मीडियासह व्हॉट्स ॲप, टेलिग्रामवर प्रामुख्याने अशा लिंक शेअर होतात. त्याचा नागरिकांवर विपरीत परिणाम होतोच. परंतु पोलिस विभाग, निवडणूक आयोग देखील धारेवर धरला जातो. आचारसंहितेच्या काळात मात्र अशा गोष्टींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून वरिष्ठांमार्फत यासाठी स्वतंत्र वॉर रूम स्थापन केल्याचे सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.
व्हॉट्स ॲप ग्रुपचा ॲडमिनही जबाबदार
- नियमानुसार, कोणत्याही फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियाच्या पेजवर, व्हॉट्स ॲप ग्रुपवर कोणी अशी वादग्रस्त, खोट्या बातम्यांची पोस्ट शेअर केल्यास ती शेअर करणाऱ्यासह ग्रुप 'ॲडमिन'ला देखील गुन्ह्यात जबाबदार धरले जाणार आहे.
- चुकीची माहिती, दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा मजकूर, छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफित पाठवल्यास ते डिलिट करावे. ते जसेच्या तसे पुढे पाठवू नये.
- ग्रुप नियंत्रणाबाहरे जात असल्यास प्रमुखाने, संबंधितांनी त्यावर नियंत्रण ठेवावे. मजकूर गंभीर असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
येथे करा तक्रार
अफवा, खोट्या बातम्या आढळल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा. त्याशिवाय https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावर तक्रार करू शकता. शिवाय आयोगाच्या c-VIGIL या ॲपवर डाऊनलोड करून तक्रार नोंदवू शकता.
...तर गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा
भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (ए), कलम १५३ (क), कलम ४९९, आणि ५०४, ५०५ (१) अंतर्गत गुन्हा दाखल होतो. शिवाय, माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७, ६९, ७९ नुसार देखील कारवाई होऊ शकते.
तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई
नागरिकांनी अशा कुठल्याही फेक पोस्ट, जुन्या किंवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. परंतु त्या शेअर करणारे, कमेंट करणाऱ्यांवर वॉर रूमद्वारे विशेष लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांना आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई होईल.
- प्रशांत स्वामी, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.