प्रशासनाची गती म्हणजे मुंगीचाही अपमान; हरिभाऊ बागडेंनी डागली तोफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:54 PM2018-02-06T12:54:26+5:302018-02-06T12:56:58+5:30
गीच्या पावलानं प्रशासन चाललंय असे म्हटलं तर मुंगीचादेखील अपमान होईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या साक्षीने सरकारलाच घरचा आहेर दिला.
औरंगाबाद : मुंगीच्या पावलानं प्रशासन चाललंय असे म्हटलं तर मुंगीचादेखील अपमान होईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या साक्षीने सरकारलाच घरचा आहेर दिला. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत बागडे यांच्यासह आ. अतुल सावे यांनीदेखील मनपाला डीपीसीतून निधी मिळत नसल्यामुळे अर्थमंत्र्यांसोबत शाब्दिक वाद घातला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा प्रकार समोर आला.
बागडे म्हणाले, शाळा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण, पाणीपुरवठा यांच्यासह अपंगांचे अर्ज, घरकुलांचे काम, या मूलभूत गोष्टींना वेळेत पूर्णत्वास नेण्याची मानसिकता यंत्रणेने जोपासली पाहिजे. शासनाने निधी देऊनही ३ ते ४ वर्षांपासून वरील कामे होत नाहीत. ही गती मुंगीच्या पावलांचादेखील अपमान करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढे निवडणुकांना सामोरे जायचे आहे. प्रशासकीय पातळीवर कामे होत नसतील तर अवघड परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने अर्थमंत्र्यांसमोर भाजप आमदारांनी प्रशासनावर खापर फोडले. खा.चंद्रकांत खैरे, आ.संजय शिरसाट यांनी सुभेदारी विश्रामगृह, अॅमेझेमंट पार्कच्या निधीबाबत मुद्दे मांडले.
आ. इम्तियाज जलील म्हणाले, डीपीसीतून मिळणारा निधी हद्दीमुळे मतदारसंघात खर्च करताना अडचणी येतात. निधी आम्ही आणायचा आणि दुस-या मतदारसंघात खर्च करायचा, याबाबत उपाय समोर यावेत. कृषिसेवा, सामाजिक सेवा, पाटबंधारे विभाग मिळून ४०९ कोटींची अतिरिक्त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठकीत घोषणा केली.
मग महापालिकेचा वर्ग बदला
आ. सावे म्हणाले, नगरोत्थानमधून मनपाला पैसे मिळत नाहीत. डीपीसीतून जास्तीचा निधी मनपाला मिळावा. यावर अर्थमंत्री म्हणाले, मनपा ‘क’ वर्गात आहे, ती ‘ड’ वर्गात करून घ्या आणि मग सरकारकडे निधी मागण्यासाठी या. नगरोत्थानमधून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा कमी पडला असेल. त्यामुळे निधी मिळाला नाही. मनपा ‘क’ वर्गात आहे, ‘ड’ वर्गात नाही. यापुढे डीपीसीतून ‘क’ वर्ग मनपाला निधी न देण्याबाबतदेखील अर्थमंत्र्यांनी बैठकीत सूतोवाच केले.
निवडणुका निर्धारित वेळेतच
९ मार्च रोजी राज्य अर्थसंकल्प सादर होईल. हा अर्थसंकल्प शेवटचा आहे की अजून एक सादर होणार. यावर अर्थमंत्री म्हणाले, शिवसेना-भाजप युतीच यापुढील सर्व अर्थसंकल्प सादर करील. शिवाय निवडणुकादेखील निर्धारित वेळेतच होतील. अडीच तासांचा पेपर आम्ही सोडणार नाही. तीन तासांचा पूर्ण पेपर सरकार देईल, असेही त्यांनी नमूद केले.
कामे वेळेत पूर्णत्वास न्यावी
शाळा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण, पाणीपुरवठा यांच्यासह अपंगांचे अर्ज, घरकुलांचे काम, या मूलभूत गोष्टींना वेळेत पूर्णत्वास नेण्याची मानसिकता यंत्रणेने जोपासली पाहिजे. शासनाने निधी देऊनही ३ ते ४ वर्षांपासून वरील कामे होत नाहीत. ही गती मुंगीच्या पावलांचादेखील अपमान करणारी आहे. - हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष