अतिवेग, त्यात मध्येच दाबायचा ब्रेक; मद्यपी चालकाचा खाजगी शिवशाहीतील प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 04:25 PM2021-11-22T16:25:34+5:302021-11-22T16:26:26+5:30
संपूर्ण प्रवासात चालक वेगाने बस चालवीत होता, अचानक ब्रेक मारत होता, असे प्रवाशांनी सांगितले.
औरंगाबाद : पुण्याहून औरंगाबाद प्रवासादरम्यान मद्यपान केलेल्या खासगी शिवशाही बसच्या चालकाने अतिवेगाने बस चालवून ३० प्रवाशांच्या जिवाशी खेळ केल्याची घटना रविवारी घडली.
पुण्याहून औरंगाबादला येणाऱ्या खासगी शिवशाही बसच्या (एमएच०४ जेके ३१५७) चालकाने अहमदनगरमध्ये बस थांबवली. त्यानंतर मद्यपान करून चार प्रवाशांना विनतिकीट बसविले. घोडेगाव येथे दोन महिला प्रवाशांना बसविले. या महिलांनी एका प्रवासी महिलेची बॅग चोरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अन्य प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या दोन महिला नेवासा फाटा येथे उतरल्या. त्यानंतर चालकाने नेवासा फाटा येथे मद्यपान करण्यासाठी पुन्हा बस थांबविली.
संपूर्ण प्रवासात चालक वेगाने बस चालवीत होता, अचानक ब्रेक मारत होता, असे प्रवाशांनी सांगितले. ही बस रात्री ९ वाजता मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचली. तेव्हा प्रवाशांनी संताप व्यक्त करीत आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली. या सगळ्यात चालकाने बसस्थानकातून पळ काढला. अविनाश कदम, रंजित नरके, शरद व्यवहारे, सीमा बोरसे, आदी प्रवाशांनी आगार व्यवस्थापकांकडे चालकाविषयी तक्रार केली.