ड्रायपोर्ट समृद्धी महामार्गाला जोडण्याच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:48 AM2017-10-14T00:48:29+5:302017-10-14T00:48:29+5:30
येथील ड्रायपोर्ट जालना-औरंगाबाद महामार्गासह औद्योगिक वसाहतीच्या फेज तीनमधून जाणा-या समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील ड्रायपोर्ट जालना-औरंगाबाद महामार्गासह औद्योगिक वसाहतीच्या फेज तीनमधून जाणा-या समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया ३१ आॅक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी शासकीय विश्रामृहात आयोजित बैठकीत ड्रायपोर्टच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जेएनपीटीचे साहाय्यक अभियंता आर. बी. जोशी, अर्जुन गेही, उद्योजक किशोर अग्रवाल उपस्थित होते.
ड्रायपोर्टसाठी हस्तांतरित जमिनीपैकी ६० हेक्टर जमिनीचे सपाटीकरण, ड्रायपोर्ट ते जालना-औरंगाबाद महामार्ग आणि नियोजित समृद्धी महामार्ग हा चौपदरी रस्ता या कामांच्या निविदा प्रक्रिया येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी डिग्गीकर यांनी संबंधितांना दिल्या. औरंगाबाद-जालना महामार्ग ड्रायपोर्ट या रस्त्याच्या कामासाठी जमीन संपादन करण्यासाठी शेतक-यांचे नाहकरत प्रमाणपत्र घेण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, दिनेगाव रेल्वेस्थानक ते ड्रायपोटपर्यंत टाकण्यात येणा-या शासकीय व खाजगी जमिनीचे हस्तांतरण या कामांना जिल्हा प्रशासनाने गती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. केंद्र शासनाला ड्रायपोर्टसाठी आवश्यक असणा-या परवानग्या लवकर मिळण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती या वेळी डिग्गीकर यांनी दिली.