वेगमर्यादा 120 किमी; तरीही आलिशान वाहने ‘बेलगाम’
By संतोष हिरेमठ | Published: June 2, 2024 12:32 PM2024-06-02T12:32:35+5:302024-06-02T12:33:48+5:30
भारतीय बनावटीच्या अनेक वाहनांचा वेग १२० किमीपेक्षा जास्त आहेच. विशेषत: परदेशी बनावटीच्या वाहनांचा वेग अधिक आहे. त्यातूनच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : रस्त्यांच्या प्रकारानुसार प्रत्येक शहरातील रस्ते, महामार्गाची वेगमर्यादा निश्चित आहे. १२० किमीपेक्षा अधिक वेगमर्यादा असलेले रस्ते नाहीत; मात्र त्यापेक्षाही अतिवेगाची वाहने रस्त्यावर सहजपणे येत आहेत. भारतीय बनावटीच्या अनेक वाहनांचा वेग १२० किमीपेक्षा जास्त आहेच. विशेषत: परदेशी बनावटीच्या वाहनांचा वेग अधिक आहे. त्यातूनच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.
१६०चा वेग
पुण्यात आलिशान कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार, अपघातग्रस्त कार ताशी १६० किलोमीटर वेगाने धावत होती.
त्यामुळे रस्त्यावर किती वेगाने वाहने धावत आहेत, हे स्पष्ट होत आहे. अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर ‘स्पीड गन’च्या मदतीने कारवाई केली जाते; परंतु वाहनांमध्येच वेगमर्यादा का घातली जात नाही, असा सवाल आहे.
३० ते १२० किमी वेगमर्यादा
राष्ट्रीय व राज्य महामार्गावर ३० ते १२० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा आहे. समृद्धी महामार्गावर १२०ची मर्यादा आहे; मात्र अनेक वाहनचालक यापेक्षा वेगाने वाहन चालवितात.
‘स्पीड’वरच वाहनांची विक्री
टोलनाक्याच्या ठिकाणी अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांच्या चालकांचे समुपदेशन केले जाते परंतु वाहनांचीच वेगमर्यादा कमी राहील, याकडे सरकार आणि कंपन्यांचे दुर्लक्ष आहे. वाहनांची विक्री त्यांच्या गतीवरच होते.
वाहनांचे मार्केटिंग ‘स्पीड’वरच असते. परदेशात अधिक स्पीडने वाहने धावू शकतात. कारण तिकडे रोड डिझाइन, चांगले प्रशिक्षित चालक आहेत.
- संदीप गायकवाड,
वरिष्ठ कार्यक्रम सहयोगी, परिसर संस्था