जलवाहिनीचे काम वेगाने करा, अन्यथा दंड ! महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंपनीला बजावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 07:50 PM2021-10-21T19:50:14+5:302021-10-21T19:52:14+5:30

Aurangabad Municipal Corporation महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.

Speed up the navy, otherwise fine! Maharashtra Jeevan Pradhikaran warned the company | जलवाहिनीचे काम वेगाने करा, अन्यथा दंड ! महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंपनीला बजावले

जलवाहिनीचे काम वेगाने करा, अन्यथा दंड ! महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंपनीला बजावले

googlenewsNext

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे नवीन पाणीपुरवठा ( New Water Pipeline in Aurangabad ) योजनेची काही कामे बंद ठेवण्यात आली होती. आता पावसाळा संपला असून, कामांना गती द्या, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजिप्रा) अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला दिला आहे. नोव्हेंबरमध्ये मुख्य जलवाहिनीच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मजिप्रामार्फत योजनेचे काम सुरू आहे. हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला काम देण्यात आले आहे. कंपनीने सहा महिन्यांपूर्वीच शहरात कामाला सुरुवात केली. शहरात १५ जलकुंभ उभारण्याचे काम प्रगतिपथावर असून, आणखी ५ जलकुंभांचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच नक्षत्रवाडी येथे जलशुध्दीकरण केंद्र आणि दोन एमबीआर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सातारा-देवळाई भागात जलवाहिन्या टाकण्याचे कामही सुरू आहे, परंतु अतिवृष्टीमुळे महिनाभर सर्व कामे थांबविण्यात आली होती. आता पावसाळा संपला असून कामाला गती देण्याच्या दृष्टीने कंत्राटदारास सूचना करण्यात आल्या आहेत. कामात गती न दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांनी सांगितले.

औरंगाबादेत तयार होणार पाईप
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी कंत्राटदाराने नक्षत्रवाडीजवळ पाईप तयार करण्याची फॅक्टरी उभारण्याचे काम सुरू केले आहे. पत्र्याचे शेड उभारले जात असून, दोन मशीन आणण्यात आल्या आहेत. ऑक्टोबरअखेरीस पाईप तयार होतील. पाईपची लांबी आणि रुंदी बरीच असल्याने वाहतुकीला प्रचंड त्रास झाला असता. म्हणून पाईप औरंगाबादेत तयार केले जाणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत मुख्य जलवाहिनीचे पाईप तयार होतील अशी अपेक्षा आहे.

जायकवाडीतही कामे
योजनेत प्रामुख्याने जायकवाडी धरणावर उद्भव विहीर व पंपगृह, ३९२ एमएलडी एवढ्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, शहर व सातारा देवळाई क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी ४९ उंच तर ४ जमिनीलगत अशा पाण्याच्या ५३ टाक्या, जवळपास ४० किलोमीटर लांबीची अशुद्ध पाण्याची जलवाहिनी, ८४ किलोमीटर पाणी वाहून नेणारी जलवाहिनी व १,९११ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था, सुमारे ९० हजार घरगुती नळजोडण्या विस्थापित करणे, स्टाफ क्वॉर्टर, पंपिंग मशिनरी, एक्स्प्रेस फिडर या कामांचा समावेश आहे. नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा योजनेची वैशिष्ट्ये :
१२ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर युद्धपातळीवर कामाला सुरुवात करण्यात आली. जलवाहिन्या टाकणे, नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे इ. कामे सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.
- २४५० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी २१,०० कि.मी. अंतर्गत जलवाहिन्या
- ६०४ एमएलडी पाणी शहराला मिळेल
- २०५२ पर्यंत योजनेचा शहराला लाभ
- २ टप्प्यांत योजना पूर्ण होईल
- १५ वर्षांचा पहिला टप्पा
- १५ वर्षांचा दुसरा टप्पा
- ५५३ कोटी रुपये मुख्य जलवाहिनीचा खर्च
- २७३ कोटी अंतर्गंत जलवाहिन्यांचा खर्च
- पाण्याच्या ५३ टाक्या उभारणार
- ६६० मीटर उंचीवर नक्षत्रवाडीत एमबीआर
- ८ कोटी रुपये दरमहा विजेचा खर्च होईल

Web Title: Speed up the navy, otherwise fine! Maharashtra Jeevan Pradhikaran warned the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.