जलयुक्तच्या कामांना गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:34 AM2017-11-03T00:34:05+5:302017-11-03T00:34:11+5:30
जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवार योजनेतील कामे तत्काळ सुरू करण्याची संधी असल्याने या कामांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवार योजनेतील कामे तत्काळ सुरू करण्याची संधी असल्याने या कामांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे.
जिल्हा कचेरीत यासाठी बैठक झाली. यात २0१६-१७ च्या आराखड्यातील राहिलेली कामे तत्काळ करण्यास बजावले. यात मंजूर ३१४५ पैकी २७३२ कामे पूर्ण झाली आहेत. तर १३९ कामे रखडलेली आहेत. ती तत्काळ सुरू करण्यास सांगितले. जि.प. व जलसंधारण विभागाची कामे निविदेतच असल्याने या विभागांनी गती देण्यास सांगण्यात आले.
२0१७-१८ च्या आराखड्यातही ८0 गावे निवडण्यात आली आहेत. मात्र आता शासनाने या योजनेत मोठा बदल केला आहे. आता प्रत्येक गावात ७0 टक्के क्षेत्रविकासाच्या कामांना प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. या योजनेला यंदा ७.६0 लाख मंजूर आहेत. तर ७.४0 कोटींच्या विशेष निधीतील २६७ कामांना ७0 टक्के क्षेत्रविकासांतर्गत मंजुरी दिली आहे. या नव्या बदलामुळे पहिल्या टप्प्यात वनविभाग व कृषी विभागालाच कामे करावी लागणार आहेत. त्यानंतर परिसरातील ड्रेनेज ट्रिटमेंटची कामे केली जाणार आहेत. यात सिमेंट बांध, पाझर तलाव आदी मोठ्या कामांचा समावेश राहणार आहे.