समृद्धी महामार्गाच्या कामास वेग; बोगद्यासाठी झटतेय परप्रांतीय कामगारांची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:44 PM2020-12-02T17:44:06+5:302020-12-02T17:47:01+5:30
सध्या सावंगी जंक्शनच्या पूर्वेला डोंगरातून बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
- विजय सरवदे
औरंगाबाद : समृद्धी महामार्ग अर्थात ‘नागपूर- मुंबई सुपर एक्स्प्रेस वे’ हा औरंगाबादसाठी वरदान ठरणार आहे. सध्या सावंगी जंक्शनच्या पूर्वेला डोंगरातून बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्या कामावर अत्याधुनिक यंत्र व परप्रांतीय निष्णात कामागारांची फौज रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. बोगद्याचे काम पूर्ण करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने ९० दिवसांची मुदत दिली आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामाचे अवलोकन करण्यासाठी सोमवारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी सावंगी जक्शनच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला भेट दिली. चौका घाटाकडे जाताना अलिकडे डाव्या बाजूला डोंगराच्या पलिकडे गेल्यास माळीवाड्याकडून डोंगराच्यापायथ्यापर्यंत या महामार्गाचे काम आले आहे. सध्या तिथे डोंगर फोडण्याचे काम मोठमोठ्या यंत्रांद्वारे केले जात आहे. जळगावर रोडवर सावंगी जंक्शनचे कामही जोरात सुरू आहे. जळगाव रोडवरून समृद्धी महामार्ग हा मुंबईकडे जाणार असून तिथे उड्डाणपुल उभारण्याचे काम सुरू आहे.
याशिवाय या महामार्गाला औरंगाबादची कनेक्टिव्ही देण्यासाठी तिथे वाहनांना खाली उतरण्यासाठी व महामार्गावर जाण्यासाठी सुविधा तयार केली जात आहे. त्यालाच ‘जंक्शन’ असे म्हटले जाते. या जंक्शनपासून पूर्वेला भला मोठा डोंगर असून त्यातून बोगदा तयार केला जात आहे. सध्या जालन्याकडून त्या डोंगरापर्यंत समृद्धी महामार्गाचे काम आले आहे. पोखरी शिवारात असलेल्या हा डोंगर पोखरण्यासाठी एक अत्याधुनिक यंत्र, जेसीबी व अन्य यंत्रसामुग्री अहोरात्र परिश्रम घेत आहे. या कामावर झारखंड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, सिक्कीम येथील अनुभवी कामगारांची फौज जुंपली असून २६० मिटर लांबिच्या या बोगद्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याची ‘डेड लाईन’ राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘मेग इंजिनिअरिंग’ या कंत्राटदार संस्थेला दिली आहे. डोंगराला काँक्रिटीकरणातून लोखंडी जाळी बसविण्यात आली असून यंत्राच्या सहाय्याने डोंगराला छिद्र पाडले जाते. त्या छिद्धात स्फोटके भरुन मग त्याचा स्फोट केला जातो. जेसीबी, पोकलेनद्वारे दगडांचा ढीग बाजूला करुन लगेच वरच्या दिशेने व बाजूला आधार देऊन हे काम पुढे केले जाते.
मेपासून रस्ता वाहतुकीचा संकल्प समोर ठेवून अंतिम मुदत निश्चित
यासंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए. बी. साळुंके यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावरून नाशिकपर्यंत १ मे रोजी वाहतूक सुरू करण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टिकोनातून फेब्रुवारीअखेरपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण करण्याची मेगा इंजिनिअरिंगला मुदत दिली आहे. ६ पदरी असलेल्या या रस्त्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. २६० मीटर लांबीच्या या बोगद्याचे काम दोन्ही बाजूने केले जाणार आहे. सध्या दुसरे यंत्र येईपर्यंत एका बाजूने काम सुरू आहे. लवकरात लवकर दुसरे यंत्र प्राप्त झाले, तर फेब्रुवारीअखेरपर्यंत काम पूर्ण होऊ शकते, असे ते म्हणाले.