भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोटारसायकलस्वारास जोराची धडक, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 05:08 PM2017-09-10T17:08:52+5:302017-09-10T17:08:59+5:30

सिल्लोड तालुक्यातील पालोदजवळ धोकादायक वळणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली.

A speeding motorcycle collides with a motorbike, a death of one | भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोटारसायकलस्वारास जोराची धडक, एकाचा मृत्यू

भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोटारसायकलस्वारास जोराची धडक, एकाचा मृत्यू

googlenewsNext

श्यामकुमार पूरे
सिल्लोड/ पालोद, दि. 10 - सिल्लोड तालुक्यातील पालोदजवळ धोकादायक वळणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कार व मोटरसायकल दोन्ही वाहने जळून खाक झाली व मोटर सायकलस्वार शिक्षक फेकल्या गेल्याने जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झाला. फरार झालेला कार चालक पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी चालकास अटक केली आहे.

या अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव फुलचंद चिंतामण पाटील वय 57 रा. ओझर ता. चाळीसगाव. हल्ली मुकाम सिल्लोड (म्हसोबा नगर )असे आहे. सदर शिक्षक हे लिहाखेडी येथील मुर्डेश्वर हायस्कूलमध्ये कार्यरत होते.

स्विफ्ट कार ही सिल्लोडकडून जळगावकडे जात होती. तर मोटरसायकल क्रमांक एमएच 20- 4339 स्वार शिक्षक फूलचंद पाटील हे लिहाखेडी येथील मुर्डेश्वर हायस्कूलमधून एक्स्ट्रा क्लास घेऊन मोटारसायकलवर परत येत असताना पालोद येथील वळण रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.  मोटरसायकलस्वारास त्यांनी जोराची धडक दिली. मोटरसायकलला कारने शेतात फरफटत नेले. तर धडक बसल्याने पाटील रोडच्या कडेला फेकल्या गेले.  डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.

भरधाव वेगाने जाणारी कार मोटरसायकलसहीत मकाच्या शेतात घुसली. मोटरसायकल आणि कारने पेट घेतला. बघता बघता दोन्ही वाहने जळून खाक झाली. हा अपघात बघण्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच, वाहतूक पोलीस व सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस कर्मचारी काळे, एस. आय. भिसे, विजय सोनवणे, पल्लाड, ढोके यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. मृत फूलचंद पाटील यांचे शव हे सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करुन कार चालकास ताब्यात घेतले. अपघात प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप सावळे हे करीत आहे. सदर मृत शिक्षकाला 1 मुलगा, एक मुलगी, पत्नी असून मुलगा पुणे येथे इंजीनियर चे शिक्षण घेत आहे. मुलाचे लग्न झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मार्चमध्ये होणार होते निवृत्त
सदर शिक्षक पाटील हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते. चालीसगाव तालुक्यातील ओझर येथील राहिवाशी असून सिल्लोड येथे म्हसोबा नगर मध्ये ते भाड्याने खोली घेऊन राहत होते. त्यांची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी सुटी असूनही ते लिहाखेड़ी येथे क्रीड़ा स्पर्धा सुरू असल्याने मुलांची एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेण्यासाठी शाळेवर गेले होते.

स्टेअरिंग रॉड तुटला
अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शिनी कारचा स्टेअरिंग रॉड तूटल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले. तर काहीनी हँड ब्रेक लावल्याने गाडीने पेट घेतल्याचे सांगितले. खरा काय प्रकार आहे याचा तपास पोलीस करीत आहे.

कार चालक पसार
अपघात झाल्यावर कार चालक कार सोडून पसार झाला. नंतर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी चालकास अटक केली आहे.

मका ही जळाला
कार व मोटरसायकलने मका शेतात पेट घेतला, यामुळे शेतातील खळाभर उभे मका पिक जळून खाक झाले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
----------------------------
अन् सर्व बघत होते...
अपघातग्रस्त दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता. कुणी मोबाइलमध्ये शूटिंग घेत होते तर कुणी फोटो. पोलीसही आले त्यानी ही बघ्याची भूमिका घेतली. पण कुणी फायर ब्रिगेडला बोलावले नाही. यामुळे दोन्ही वाहने जळून खाक झाली.

Web Title: A speeding motorcycle collides with a motorbike, a death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.