भरधाव शिवाई इलेक्ट्रिक बसची कारला पाठीमागून धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 13:17 IST2023-07-17T13:17:00+5:302023-07-17T13:17:31+5:30
एसटीच्या शिवाई इलेक्ट्रिक बसचा राज्यातील पहिला अपघात छत्रपती संभाजीनगरजवळ, कार चालकाचा जागीच मृत्यू, तर कारमधील ५ जण जखमी

भरधाव शिवाई इलेक्ट्रिक बसची कारला पाठीमागून धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू
वाळूज महानगर : अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवाई बसने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी मध्यरात्री वाळूजजवळ घडली. या अपघातात कारचालक सय्यद जावदे सय्यद हनीफ (३३, रा. देऊळगाव मही, जि.बुलढाणा) याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक शिवाई बस (क्रमांक एम.एच.१२,व्ही.एफ.४०३४) ही रविवारी रात्री अहमदनगर आगारातून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली. वाळूजच्या पथकर नाक्याजवळ भरधाव वेगातील या बसने समोरील कारला ( क्रमांक एम.एच.२८, ए.५७८६) पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे कार रस्ताच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटली.
अपघातात कारचालक सय्यद जावेद सय्यद हनीफ (३३, रा.देऊळगावराजा, जि.बुलढाणा) हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. तर कारमधील शेख वसीम शेख मुस्लिम (३०), दानिश खान रियाज खान (३०), शेख इसाक शेख गुलाम (२८), शेख समीर शेख नजीर (२७, सर्व रा.देऊळगाव मही, ता.देऊनळगावराजा, जि.बुलढाणा) हे पाच जण गंभीर जखमी झाले.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गिता बागवडे, उपनिरीक्षक सखाराम दिलवाले, पोहेकॉ.अभिमन्यु सानप आदींनी अपघातस्थळी जाऊन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातास कारणीभूत शिवाई बसचालक सागर गोकुळ भिंगारे (२६, रा.जैतापूर-हतनुर, ता.कन्नड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात कारच्या पाठीमागील व बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.