थांबलेल्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक, एक ठार दोन गंभीर जखमी: झाल्टा फाटा येथील घटना
By राम शिनगारे | Published: October 10, 2022 09:04 PM2022-10-10T21:04:09+5:302022-10-10T21:04:21+5:30
नातेवाइकांना भेटण्यासाठी निघालेल्या पिकअपला भरधाव वेगात येत आयशरने जोरदार धडक दिली.
औरंगाबाद : नातेवाइकांना भेटण्यासाठी निघालेल्या पिकअपला भरधाव वेगात येत आयशरने जोरदार धडक दिली. यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात धुळे-सोलापूर नवीन बायपास रोडवरील गांधेली शिवारात सोमवारी सकाळी घडला. या घटनेची चिकलठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
गयाबाई नरहरी लाड (वय ६५, रा. इंद्रप्रस्थनगर, बजाजनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. विष्णू नरहरी लाड (४०), गीता विष्णू लाड (३५) अशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब परभणी येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी पिकअपने (एमएच २० ईएल ३०२३) जात होते. पिकअप गांधेली शिवारात थांबविल्यानंतर मागून येणाऱ्या भरधाव आयशरने (एमएच १८ बीजी ७०१५) जोराची धडक दिली. या धडकेत विष्णू यांच्या आई गयाबाई जागीच ठार झाल्या. विष्णू, गीता हे गंभीर जखमी झाले. मुली सोनाली, वैष्णवी या किरकोळ जखमी झाल्या. जखमींवर घाटीत उपचार सुरू आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आयशर चालकावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अपघातातील जखमीचा मृत्यू
दुसऱ्या एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. कुणाल कान्हू वीर (२२, रा. घारदोन, ता. औरंगाबाद) असे मृत युवकाचे नाव आहे. ६ ऑक्टोबर रोजी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील एसआरपीएफ कॅम्पजवळील अपघातात तो जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेची सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.