सर्वपित्री संपताच उमेदवारीला उधाण
By Admin | Published: September 25, 2014 12:59 AM2014-09-25T00:59:22+5:302014-09-25T00:59:31+5:30
औरंगाबाद : पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्या संपताच विधानसभा निवडणूक अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
औरंगाबाद : पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्या संपताच विधानसभा निवडणूक अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. शिवसेना- भाजपाची युती झाली असली तरी उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदारांना उद्या २५ रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी ९ वाजेपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणाऱ्या सवाद्य मिरवणुकीतून उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये पाहावयास मिळेल.
इतर उमेदवारदेखील उद्याच अर्ज दाखल करणार आहेत. आज दिवसभर प्रत्येकाची मिरवणुका काढून अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू होती. शिवसेनेकडून आ. प्रदीप जैस्वाल, एमआयएमकडून इम्तियाज जलील, पूनमचंद बमणे हे मध्य मतदारसंघातून तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे आ. संजय शिरसाट, एमआयएमकडून गंगाधर गाडे हे अर्ज भरणार आहेत.
भाकपचे डॉ. भालचंद्र कांगो हे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
काही उमेदवारांनी सिनेअभिनेते, अभिनेत्रींना मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी बोलावले आहे. यामध्ये मराठी-हिंदीतील कलाकारांचा समावेश आहे.