रस्ते कंत्राटदाराला वाचवण्यासाठी फोडला सांडवा; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 07:12 PM2021-07-27T19:12:15+5:302021-07-27T19:17:29+5:30
तलावाला दरवाजा असतानाही सांडवा फोडून पाणी काढण्याचे हे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.
औरंगाबादः खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पाटबंधारे विभागानेच राजरोसपणे फोडला. जलक्षेत्रातून गेलेल्या ५०० मीटर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला वाचवण्यासाठी ऐन पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या तलावाचा सांडवा फोडण्याची ''कामगिरी'' अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली.
तलावातून पाणी सोडण्यासाठी एक दरवाजाही आहे. पण त्या दरवाजाने टप्प्याटप्प्याने पाणी न सोडता सांडवाच फोडला. तलावाला दरवाजा असतानाही सांडवा फोडून पाणी काढण्याचे हे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. तलावाच्या कार्यक्षेत्रात येणारा ५०० मीटर लांबीचा रस्ता सुमार दर्जाचा बनविण्यात आला होता. या कामात लांबी-रुंदी, खडीकरण, डांबरीकरणाचे कोणतेही निकष पाळण्यात आलेले नाहीत. मात्र असे होऊनही एमएसआरडीसी कंत्राटदारावर मेहेरबान झाली. पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली. तलावाच्या पाण्याने रस्त्याचे अधिक नुकसान होईल म्हणून बांध फोडला, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
'अखेर सांडवा फोडलाच'; ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रशासनाने २० टक्के पाणी सोडले
तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्या दोन पावसांत आरणवाडी तलाव ८० टक्क्यांहून अधिक भरला. पाण्याच्या दाबामुळे रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाल्याचे कारण पुढे करून कंत्राटदाराने एमएसआरडीसीला हाताशी धरून जलसंधारण विभागाला पत्र लिहून तलावातील पाणी कमी करण्याची विनंती केली. यानुसार एमएसआरडीसी, जलसंधारण विभाग आणि कंत्राटदाराने संगनमत करीत तलावात अधिक पाणी साठल्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण दाखवून चक्क पोकलेन लावून तलावाचा सांडवा फोडला. अधिकारी आणि कंत्राटदारांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हे दाखल करून दंड वसूल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे. धारूरच्या कृउबा सभापती सुनील शिनगारे, आरणवाडी सरपंच लहू फुटाणे, बाळासाहेब चव्हाण, गणेश चव्हाण, मधुकर चव्हाण, लहू शिनगारे, विजय माने, नाना माने, अविनाश माने आदी गावकऱ्यांनी निवेदन पाठविले आहे.
पहाटेच्या अंधारात फोडला तलाव
पाच गावकऱ्यांनी प्रखर विरोध करत तीन दिवस काम अडवले होते. याच कालावधीत धारूरच्या तहसीलदारांनी तलावाची पाहणी करीत रस्त्याला कोणताही धोका नसल्याचा अहवाल दिला होता. मात्र, जलसंधारण व एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणात पहाटे अंधारात तलावाचा सांडवा फोडून टाकला.