महात्मा गांधींना अनोखी आदरांजली; २५६५ जणांची एकाच वेळी सूतकताई, रेकॉर्डची झाली नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 19:24 IST2024-10-02T19:23:45+5:302024-10-02T19:24:24+5:30
महात्मा गांधी जयंती विशेष : एकाचवेळी २ हजार ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा सूतकताई करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली, या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

महात्मा गांधींना अनोखी आदरांजली; २५६५ जणांची एकाच वेळी सूतकताई, रेकॉर्डची झाली नोंद
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन संस्थेने एकाच वेळी सूतकताईचा विक्रम नोंदवला आहे. जेएनईसी महाविद्यालयाच्या मैदानावर एकाचवेळी २ हजार ५६५ विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक चरखा सूतकताई करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी दिली.
एमजीएम विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीनिमित्त सामूहिक सूतकताईचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदोर येथील आयआयटीतील प्रा. डॉ. कीर्ती त्रिवेदी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी.एम. जाधव, कुलगुरू डॉ. सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उपक्रमात सूतकताईसाठी आठ समूहांमध्ये प्रत्येकी २५० विद्यार्थी सहभागी झाले. प्रत्येक समूहाने अर्धा तास सूतकताईचे काम करीत या विक्रमामध्ये सहभाग नोंदविला. त्यासाठी स्पिंडल टकली ११०, दोन स्पिंडल चरखा १००, आठ स्पिंडल चरखा ३० आणि १० पेटी चरख्याचा वापर करण्यात आला आहे. खादीपासून तयार झालेले कपडे आणि विविध वस्तूंची खरेदी करण्यात येते. या वस्तूंच्या निर्मितीची प्रक्रिया विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी सूतकताईच्या माध्यमातून समजून घेतली. यावेळी नाट्यशास्त्र विभागाच्या राहुल खरे यांच्या संघाने विविध भजने व गीतांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजू सोनवणे यांनी केले. आभार अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी मानले.
खादी हा एक विचार
राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अनेकांना विसर पडत आहे. त्यावेळी एमजीएम विद्यापीठात चरख्याद्वारे सूतकताई करण्यात येते. ही निश्चितच प्रेरणा देणारी बाब आहे. मिठाचा सत्याग्रह आणि खादी ग्रामोद्योग जागरणच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला घालवले. खादी केवळ कताई करण्यापुरती मर्यादित नसून, हा एक विचार असल्याचे प्रतिपादन डॉ. कीर्ती त्रिवेदी यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. जाधव, कुलगुरू डॉ. सपकाळ, डॉ. गाडेकर यांच्यासह एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या न्यायनिर्णय प्रमुख रेखा सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले.