भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बँका, मोंढा, एमआयडीसी, सरकारी कार्यालयातील व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 02:18 PM2020-01-08T14:18:07+5:302020-01-08T14:30:28+5:30
शेतकरी, कामगार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग आहे
औरंगाबाद : देशव्यापी भारत बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, औद्योगिक आणि मोंढा कामगार यांनी सहभाग आहे. यामुळे शहरातील बँक, मोंढा, एमआयडीसी, सरकारी कार्यालयातील व्यवहार ठप्प झाले आहेत.
सकाळी बँक कर्मचाऱ्यांनी क्रांती चौकात एकत्र येत निदर्शने केली. एसबीआय वगळता सार्वजनिक क्षेत्रातील अन्य 18 बँक सहभागी. जिल्ह्यातील बँकेचे 7 ते 8 हजार कर्मचारी संपात. खाजगी बँका सुरू. सुमारे 800 कोटीचे व्यवहार ठप्प असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. यावेळी अन्य कामगार संघटना सुद्धा यात सामील झाल्या होत्या.
घाटी येथील शासकीय रुग्णालयात परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कामगार बंदमध्ये सहभाग झाले. यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. आरटीओ आणि रजिस्टरी कार्यालयातील व्यावासाहारावर बंदचा परिणाम झाला आहे. महसूल कार्यालयातील कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाल्याने कार्यालयात शुकशुकाट आहे.
रजिस्टरी ऑफिस कार्यालयात संपामुळे शुकशुकाट. देशव्यापी संपामुळे नोंदणी व मुद्रांक कार्यालयात वर्ग 3 व वर्ग 4 चे कर्मचारी100 टक्के सहभागी असल्याने कार्यालय बंद आहे . असे असले तरी राजपत्रित अधिकारी हजर आहेत असे सह जिल्हा निबंधक सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.
यासोबतच वाळूज एमआयडीसीमध्ये भारत बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो कामगार मोर्चासाठी औरंगाबादमध्ये दाखल झाली आहेत. दरम्यान, बंदमध्ये काही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या कंपन्या समोर एसआरपी व पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तसेच सिल्लोड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गोळेगाव येथील महामार्गावर रस्तारोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.