वाळूज उद्योगनगरीत लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:04 AM2021-03-14T04:04:56+5:302021-03-14T04:04:56+5:30

: बाजारपेठा ओस; रस्त्यावर तुरळक गर्दी वाळूज महानगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.१३) आयोजित पूर्ण लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

Spontaneous response to lockdown in Waluj industrial city | वाळूज उद्योगनगरीत लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाळूज उद्योगनगरीत लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

: बाजारपेठा ओस; रस्त्यावर तुरळक गर्दी

वाळूज महानगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.१३) आयोजित पूर्ण लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. औद्योगिक क्षेत्रातील उद्योग सुरू असले तरी जवळपास ३० टक्के कंत्राटी कामगारांनी दांडी मारत घरी राहणेच पसंत केले. लॉकडाऊनमुळे परिसरातील बाजारपेठा ओस पडल्याने रस्त्यावर नागरिक व वाहनांची तुरळक गर्दी होती.

शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने जिल्हाभरात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: तर शनिवार व रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित केला. पूर्ण लॉकडाऊनचा शनिवारी पहिला दिवस असल्यामुळे औद्योगिक क्षेत्र व बजाजनगर, रांजणगाव, पंढरपूर, वाळूज, जोगेश्वरी, सिडको वाळूज महानगर आदी ठिकाणी सर्वत्र सामसुम होती. पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीने या पूर्ण लॉकडाऊनविषयी दोन दिवसांपासून ध्वनिक्षेपाद्वारे जनजागृती केल्यामुळे नागरिक व व्यावसायिक घराबाहेर पडले नाहीत. या लॉकडाऊनमध्ये संचारबंदी नसल्यामुळे काहीजण रस्त्यावर फेरफटका मारताना तसेच गप्पा मारताना दिसून आले. वसाहती सुनसान असल्यामुळे तरुणांनी गल्लीत क्रिकेट खेळाचा आनंद लुटला. पंढरपूर, बजाजनगरातील भाजी मंडईतही ग्राहक न फिरकल्यामुळे विक्रेते ग्राहकांची प्रतीक्षा करताना दिसून आले. पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी भेटी देऊन नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसादही दिला.

उद्योग सुरू; पण...

उद्योगनगरीतील मोठ्या व छोट्या कंपन्या सुरू असल्याने कामगारांची ने-आण करणाऱ्या बस व वाहनांची रस्त्यावर ये-जा सुरू होती. लॉकडाऊनमुळे कायमस्वरूपी कामगार कामावर रुजू झाले होते. मात्र, शहर व ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या जवळपास ३० टक्के कंत्राटी कामगारांनी कामावर न येता घरी राहणेच पसंत केल्याचे मसिआचे सचिव राहुल मोगले, अब्दुल शेख, अर्जुन गायकवाड आदींनी सांगितले.

बाजारपेठा ओस; रस्त्यावर तुरळक गर्दी

लॉकडाऊनमुळे वाळूज महानगरातील मॉल्स, शॉपिंग सेंटर, मोठ्या हॉटेल्स बंद असल्याने बाजारपेठा ओस पडल्या होत्या. या भागातील रुग्णालये, औषधी व किराणा दुकाने आदी नेहमीप्रमाणे सुरू होती. लॉकडाऊनच्या काळात पोलीस कारवाई करतील, या भीतीपोटी अनेकांनी घराबाहेर पडणे टाळल्यामुळे रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून आली. या लॉकडाऊनदरम्यान एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्दन साळुंके आदींनी ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी करीत नागरिकांना सूचना दिल्या.

फोटो ओळ- पंढरपूरात पूर्ण लॉकडाऊनमुळे मुख्य बाजारपेठेत असा शुकशुकाट दिसून आला.

फोटो क्रमांक- पंढरपूर

फोटो ओळ- रांजणगावात लॉकडाऊनमुळे असा शुकशुकाट दिसून आला.

फोटो क्रमांक- रांजणगाव

--------------------------

Web Title: Spontaneous response to lockdown in Waluj industrial city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.