स्पॉट अॅडमिशनचा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:45 AM2017-08-25T00:45:32+5:302017-08-25T00:45:32+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर प्रवेशासाठी ठेवलेल्या स्पॉट अॅडमिशनचा पूर्णपणे फज्जा उडाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर प्रवेशासाठी ठेवलेल्या स्पॉट अॅडमिशनचा पूर्णपणे फज्जा उडाला. रिक्त जागा किती, प्रवेश किती झाले, कशाच्या आधारावर प्रवेश द्यायचे, याची कोणतीही नियमावली तयार नसाताना राज्यभरातून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावण्यात आले. दिवसभर शांतता बाळगलेल्या विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत सायंकाळी सात वाजेनंतर झाला. विधि, गणित आणि रसायनशास्त्र विभागात विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या दलानात प्रवेश करीत घोषणाबाजी केली. विद्यापीठात रात्री उशिरापर्यंत हजारो विद्यार्थी ठाण मांडून होते.
विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला. यात सुरुवातीपासूनच नियोजनाचा अभाव असल्यामुळे स्पॉट अॅडमिशनच्या दिवशी सर्व विभागांमध्ये गोंधळ निर्माण झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत नोंदणीसाठी वेळ दिला होता. मात्र, प्रचंड प्रमाणात विद्यार्थी आल्यामुळे वेळेत नोंदणी झाली नाही. कागदपत्रे तपासणी, पडताळणी करून रात्री उशिरापर्यंत यादी लावण्यात अपयश आले. मराठवाड्याच्या कानाकोपºयातून विद्यार्थी आले होते. त्याच्या राहण्याची, परत जाण्याची आणि जेवणाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दिवस मावळतीला लागताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली होती. गणित विभागात कोणतीच प्रक्रिया होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी थेट कुलगुरूंचे दालन गाठत जाब विचारला. काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. विधि विभागातही तशीच अवस्था झाली होती. पत्रकारिता विभागात उशिरापर्यंत यादीच लागली नाही. रसायनशास्त्र विभागात प्रवेशासाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांची गर्दी होती. त्या ठिकाणी सर्व प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी सकाळपासून दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेतली. रात्री ६ वाजता गुणवत्ता यादी लावली. त्यानंतर तात्काळ प्रवेश प्रक्रिया सुरू केली. मात्र, विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. माइकवर सूचना देण्यात येत होत्या. पोलिसांच्या गाड्या बोलावण्यात आल्या, तरीही विद्यार्थी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी गोंधळात वाढ झाली. विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. विभागावर दगडफेक सुरू केल्याचे विभागातील ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. अंजली राजभोज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या गोंधळानंतर तात्काळ विभागाच्या गेटला कुलूप लावण्यात आले होते. रसायनशास्त्र विभागप्रमुख विद्यापीठ प्रशासनाकडे अतिरिक्त मदत मागत असताना वेळेत ती पोहोचली नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियाच थांबविण्यात आली.