दिसली जागा, भरला पेग; 'ओपन बार'वरील दारूड्यांचा १०० ऊठबशांसह यथेच्छ 'सत्कार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:00 IST2025-02-13T18:59:08+5:302025-02-13T19:00:05+5:30

नागरिकांच्या संतापाचा परिणाम; अवैध दारूविरोधात पोलिसांना खडबडून जाग, जेथे दारू पिताना आढळले, त्याच जागेवर १०० ऊठबशांसह यथेच्छ सत्कार

Spot found, Alcohol Peg filled; 'Open Bar' drunkers receive lavish 'reception' with 100 Squats | दिसली जागा, भरला पेग; 'ओपन बार'वरील दारूड्यांचा १०० ऊठबशांसह यथेच्छ 'सत्कार'

दिसली जागा, भरला पेग; 'ओपन बार'वरील दारूड्यांचा १०० ऊठबशांसह यथेच्छ 'सत्कार'

छत्रपती संभाजीनगर : रांजणगाव कमळापूर परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिला, तरुणी रस्त्यावर उतरल्याने स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा खडबडून जागी झाली. मंगळवारी रात्री मुकुंदवाडी, एमआयडीसी वाळूज परिसरातील १३ ठिकाणी कारवाई करत दारू विक्रीच्या टपऱ्या, अवैध हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी रांजणगाव-कमळापूर रस्त्यावर हॉटेलच्या नावाखाली अवैध देशी दारू विक्री सुरू होती. शेकडो नागरिकांना त्रास होणाऱ्या हॉटेलकडे एमआयडीसी वाळूज पोलिस मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत होते. त्यामुळे संतापलेल्या महिला रस्त्यावर उतरल्या व थेट दुकानावर छापा टाकत ते बंद पाडले. या प्रकारामुळे शहरातील सर्वच भागांतील खुलेआम भरणाऱ्या दारूपार्ट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. रांजणगावच्या महिलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शहर पोलिस खडबडून जागे झाले. मंगळवारी रात्री परिसरात या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली.

१३ टपऱ्या, हॉटेल उद्ध्वस्त
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेनंतर निरीक्षक संदीप गुरमे यांच्या ५ पथकांनी वाळूज, एमआयडीसी वाळूज व मुकुंदवाडीत अवैध दारू विक्री, दारू पिऊन देणाऱ्या १३ टपऱ्या, हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले.

जागेवर ऊठबशा
शहरात ठिकठिकाणी उघड्यावरच दारू रिचवली जाते. अशा ठिकाणांवर रात्री गुन्हे शाखेने जात पार्ट्या करणाऱ्यांना तेथेच १०० उठबशा मारायला लावून ‘यथेच्छ सत्कार’ केल्याने दारूड्यांच्या पायात चांगलेच गोळे आले.

येथे कारवाईची गरज
बड्या वाईन शॉपच्या आसपास मद्यपी उघड्यावरच बैठक बसवतात. उघड्यावर लघुशंका करतात. यामुळे महिला, तरुणींना ये-जा करणेही अवघड जाते. यात प्रामुख्याने टीव्ही सेंटर, जैस्वाल हॉलसमोरील परिसर, राजीव गांधी मार्केट, सिडको बसस्थानक, विभागीय क्रीडा संकुल परिसर, बीड बायपासवरील गोदावरी टी-पॉइंट, शिवाजीनगर, मोंढा नाका उड्डाणपुलाखालील परिसरात मद्यपींचा मोठा त्रास आहे. येथेही पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Spot found, Alcohol Peg filled; 'Open Bar' drunkers receive lavish 'reception' with 100 Squats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.