दांडियाप्रेमींच्या उत्साहाला उधाण
By Admin | Published: October 7, 2016 12:44 AM2016-10-07T00:44:42+5:302016-10-07T01:30:17+5:30
औरंगाबाद : ‘लोकमत’च्या सहकार्याने व संदीप साऊंडस्, प्रोझोन व लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोझोन मॉल
औरंगाबाद : ‘लोकमत’च्या सहकार्याने व संदीप साऊंडस्, प्रोझोन व लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोझोन मॉल येथे आयोजित भव्य स्वरराज रास दांडियात गुरुवारी दांडियाप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले. मित्रपरिवार व कुटुंबियांसह एकत्रितपणे दांडिया खेळण्यात प्रत्येक जण हरवून जात आहे. त्यामुळे रास दांडियाला चांगलीच रंगत येत आहे.
‘लोकमत’च्या सहकार्याने व संदीप साऊंडस्, प्रोझोन व लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरराज रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक ग्रामीण नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, डॉ. विजय वाडकर, मनीषा वाडकर, डॉ. विजय चाटोरीकर, वृषाली चाटोरीकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. नवरात्रोत्सवातील प्रत्येक दिवशी याठिकाणी दांडिया खेळण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. विविध वेशभूषा साकारून अनेक जण सहभागी होत आहेत. तरुण-तरुणी, बालगोपाल आणि ज्येष्ठ, असे प्रत्येक जण दांडिया खेळण्यात मग्न होऊन जात आहे. टिपऱ्या खणकावत गरबा आणि दांडिया खेळत ठेका धरत आहेत. मराठी, हिंदी गीत आणि थिरकायला लावणाऱ्या संगीताच्या तालावर दांडिया खेळताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे.
जसजसा वेळ पुढे जातो तसतसा दांडिया खेळण्यात रंग येतो. रास दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला जात आहे. संगीताच्या तालावर दांडियाप्रेमी मनसोक्त थिरकत आहेत. दांडियाप्रेमींचा जल्लोष आणि धम्माल यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवस निरनिराळ्या आकर्षणांसह हा रास दांडिया रंगत आहे. निता कपूर, प्रिया कपाडिया, सविता नरवडे, पंकजा बोर्डे, सुचिता तिलपाने यांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली.
नवरात्रोत्सवा निमित्त मित्र परिवार, कु टुंबियांसह दांडिया खेळण्याचा आनंद घेता येत आहे. यानिमित्ताने प्रत्येक जण एकत्र येत आहे. उत्सवाचा एकत्रित आनंद घेण्याची संधी मिळत आहे.
- मनोज बोरा (मामाजी), अध्यक्ष, लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयल
नवरात्रोत्सवात प्रत्येक जण दांडिया खेळण्यास उत्सुक असतो. प्रोझोनमध्ये दांडिया खेळण्याची संधी मिळत आहे. यामध्ये दांडियाप्रेमींनी सहभागी होऊन उत्सवाचा आनंद घ्यावा.
-अर्शद मोहंमद, सेंटर हेड, प्रोझोन