गुप्तचर यंत्रणा निद्रितावस्थेत; समाजकंटकांच्या उद्रेकामुळे औरंगाबादची शांतता धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:07 PM2019-07-23T13:07:47+5:302019-07-23T13:10:38+5:30
गोपनीय शाखेवर प्रश्नचिन्ह...
- बापू सोळुंके
औरंगाबाद : गतवर्षी राजाबाजार, मोतीकारंजा येथील दंगलीची धग अजूनही शहरवासीयांच्या मनात कायम असताना पंधरा दिवसांपासून समाजकंटकांकडून शहराचे वातावरण पुन्हा खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असताना पोलिसांची गुप्तचर यंत्रणा निद्रितावस्थेत असल्याचे दिसत आहे.
गतवर्षी ११ आणि १२ मे रोजी किरकोळ कारणावरून नवाबपुरा, राजाबाजार येथे दोन समुदायात दंगल झाली. यानंतर शहरात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले. काही दिवसांपासून शहराची शांतता बिघडविण्यासाठी काही समाजकंटकांकडून मुुद्दामहून प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत. निवडणुकीच्या आधी शहरात वातावरण बिघडविण्याच्या दृष्टीने काही घटक अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. यामुळे यावेळीही तसे प्रयत्न होताना दिसत आहेत. शहरात घडलेल्या एखाद्या घटनेचे भांडवल करून दंगल घडविण्याचाच काही घटकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत मागील काही घटनांवरून बोध घेऊन पोलिसांनी सामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
खबऱ्यांचे जाळे कमकुवत
खबऱ्यांचे जाळे हा या विभागाचा कणा समजला जातो; परंतु हा कणा वर्षभरात कमकुवत झाल्याचे दिसत आहे. कारण शहरातील वातावरण संवेदनशील बनत आहे याची कल्पना या खात्याला आलेली नाही. शहराची ही प्रकृती लक्षात येताच तेव्हापासून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. पोलिसांना या उपक्रमांमुळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचता आले. मात्र, हा उपक्रम राबविण्यात अग्रभागी असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांशिवाय अन्य अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प आपल्या विभागाचा असल्याचे समजून यात झोकून दिले नाही. परिणामी अन्य पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांप्रमाणे जनतेची मने जिंकता आली नाहीत. विशेषत: प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याशीच स्थानिक नागरिकांचा जास्त संपर्क येत असतो. मात्र, मोजकेच अधिकारी हे जनतेशी नाळ जोडून आहेत. परिणामी कुठे काय घडते आहे, याची भणकही अधिकाऱ्यांना लागत नाही.
कसब पणाला लावावे लागेल
आयुक्तालयात कार्यरत असलेले अनुभवी तीन एसीपी आणि तीन निरीक्षक निवृत्त झाले, तर काही बदलून गेले. त्याचाही परिणाम दैनंदिन कामकाजावर दिसत आहे. बदलून आलेले बहुतेक अधिकारी प्रथमच शहरात आले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांच्याकडून उत्तम काम करून घेण्यासाठी आपले कसब पणाला लावावे लागणार आहे. पोलीस आयुक्तालयातील गोपनीय शाखेसोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गोपनीय शाखा असते. शिवाय गुन्हेशाखा आणि डी.बी.पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आता झोकून समाजकंटकांवर रात्रंदिवस नजर ठेवावी लागेल. पोलिसांना नियमित रात्रंदिवस प्रामाणिकपणे गस्त करावी लागेल. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल्स, बीअरबार, पानटपरीवर कडक कारवाई करावी लागणार आहे.
काही दिवसांतील प्रकार
- महिनाभरापूर्वी सिडकोतील एका मंदिरात अंडी फे कून विटंबना करण्याचा प्रकार झाला. समंजस नागरिक आणि पोलिसांच्या तात्काळ हजर होण्याने आविष्कार कॉलनीत झालेल्या या घटनेबाबत क्षोभ व्यक्त झाला नाही.
- पंधरा दिवसांपूर्वी २९ जून रोजी रेल्वेस्टेशन येथील प्लॅटफॉर्मवरील नामफलकाचे विद्रुपीकरण करून तेथे अन्य बॅनर लावून याबाबतची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेस्टेशनवर जमाव एकत्र आल्याने काही काळ तेथे तणाव निर्माण झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढून समाजकंटकांविरोधात कारवाई केली होती.
- १८ जुलै रोजी रात्री हडको कॉर्नर येथे वेटरला गाठून त्याला जय श्रीराम म्हणण्यासाठी दबाव टाकला आणि त्याला मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे . याप्रकरणी पोलिसांनी एक जणाला अटक केली. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
- हडकोत झालेला प्रकार ताजा असतानाच २१ जुलै रोजी रात्री बजरंग चौक ते आझाद चौक दरम्यान या अन्नपदार्थ वितरण कंपनीचा डिलेव्हरी बॉय शेख नासेर आणि शेख आमेर यांना जय श्रीराम म्हणण्याकरिता दबाव टाकून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर आझाद चौक, किराडपुरा रस्त्यावर रात्री तीन वाजेपर्यंत जमाव रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला होता.
गोपनीय शाखेला गंधवार्ताही नाही
गेल्या वर्षी झालेली दंगल आणि दीड महिन्यात शहराची शांतता भंग करणाऱ्या पाच घटनांचा आढावा घेता, पोलीस यंत्रणेतील गोपनीय शाखेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापैकी कोणत्याही घटनेची पूर्वकल्पना या विभागाला नव्हती. चार दिवसांत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन घटना घडल्या तरीही शहरात शांतता भंग करण्याचे प्रयत्न चालू आहेत काय, याची गंधवार्ताही गोपनीय शाखेला आलेली दिसली नाही.
कठोर कारवाईची अपेक्षा
दिवसेंदिवस समाजकंटक सक्रिय होत असताना पोलीस यंत्रणांकडून उपाययोजना का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत, या निवडणुका शांततेत होण्यासाठी पोलिसांना आताच समाजकंटकांच्या नांग्या ठेचाव्या लागतील. याकरिता पडद्यामागचे गुन्हेगार कोण याचा शोध आधी घ्यावा लागेल.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणतात
गेल्या काही दिवसांपासून शहराची शांतता भंग करणाऱ्या चार घटना घडल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आजपासून रोज रात्री ९ ते १२ पर्यंत पोलिसांकडून नाकाबंदी केली जाणार आहे. एवढेच नव्हे, तर रात्री अकरा वाजता सर्व बाजारपेठ, हॉटेल्स बंद केले जाणार आहेत. रोज रात्री ९ ते १२ पर्यंत नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील जनता शांतताप्रिय आहे. मात्र, काही लोक मुद्दामहून किरकोळ भांडणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या लोकांविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अफवा पसरविणाऱ्या यू ट्यूब चॅनल्सविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. एखाद्या घटनेची मोबाईलवर व्हिडिओ क्लीप तयार करून भिन्न,जाती धर्मातील लोकांमध्ये भांडण लागेल, अशा प्रकारची बातमी तयार करणाऱ्या यू ट्यूब चॅनल्सविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात येत आहेत.
पोलिसांनी करावी या बाबींची अंमलबजावणी
- शहराच्या सर्व भागांतील सर्व हॉटेल्स, बीअरबार, टपऱ्या आणि अन्य दुकाने रात्री अकरा वाजताच बंद करावीत.
- किरकोळ घटनेनंतर मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यास तणाव निर्माण होतो. जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी.
- रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, शहरात काही ठिकाणी फिक्स पॉइंट द्यावेत.
- धार्मिक स्थळे आणि पुतळ्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
- गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावरून अफवा आणि आक्षेपार्ह मजकूर वेगात प्रसारित केला जातो. हे प्रकार रोखण्यासाठी सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत.
- विविध समुदायामधील हालचालीची माहिती तात्काळ मिळावी, याकरिता पोलिसांनी विविध भागांत खबऱ्याचे नेटवर्क अधिक मजबूत करावे.
- राज्य राखीव दलाच्या जवानांचे सशस्त्र पथसंचलन शहराच्या वेगवेगळ्या भागांत करावेत.